

हडपसर: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला अवघे काही दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही पालखी सोहळ्यांतील वारकर्यांच्या सेवेसाठी हडपसर परिसरात प्रशासनाने पाणी, रस्ते व आरोग्यसेवा आदी सुविधांचे काटेकोर नियोजन करावे. भाविकांच्या सेवेत कुठलीही उणीव राहू नये, यासाठी महापालिका, पोलिस, यांसह विविध विभागांनी तयारी करावी, अशा सूचना आमदार चेतन तुपे यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
आगामी पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी हडपसर क्षेत्रीय कार्यालयात बैठक पार पडली, त्या वेळी आ. तुपे बोलत होते. (Latest Pune News)
या वेळी हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे, वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त अमोल पवार, सहायक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले, आळंदी ट्रस्टच्या विश्वस्त अॅड. रोहिणी पवार, हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले आदी उपस्थित होते.
भैरोबानाला ते सासवड रोड आणि सोलापूर रोड मार्गावर विविध ठिकाणी स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले आहे. वारकर्यांच्या सेवेसाठी 300 मोबाईल शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. निर्माल्यसंकलन करण्यासाठी 30 कचरा कंटेनरचे नियोजन केले आहे. रस्त्यांवरील झाडांच्या धोकादायक फांद्या छाटण्यात आल्याचे या वेळी महापालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले.