शंकर कवडे
पुणे: पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर जवळपास निम्म्याहून अधिक पतींना पोटगीचा भार सहन करावा लागतो. दरमहा किंवा एकरकमी पोटगीखेरीज पत्नीचे स्वतंत्र आयुष्य पाहिल्यानंतर बहुतांश पुरुषांना पुनर्विवाहाचा विचारच करू नये अशा स्थितीत असतात. यामध्ये तिशी पार केलेले तरुण सर्वाधिक वैफल्यग्रस्त दिसून येत असल्याचे वकिलांकडून सांगण्यात आले.
घटस्फोटनंतर पुरुषांची होणारी अवस्था या संदर्भात दैनिक ‘पुढारी’ने शहरातील कौटुंबिक न्यायालयात कार्यरत असलेल्या वकिलांशी संवाद साधला असता घटस्फोटानंतर पुरुष खचून जात असल्याचे सांगण्यात आले. पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात पतीला ते आनंददायी वाटते. (Latest Pune News)
‘मी तिला सोडली, सर्व गोष्टींसाठी मी सक्षम आहे,’ असा समज त्याचा निर्माण होतो. मात्र, पोटगी सुरू झाल्यानंतर त्याला आर्थिक जुळवाजुळव करावी लागते. मात्र, स्त्री स्वतंत्र होते. तिच्या राहणीमानात बदल होऊन ती जीवनाचा आनंद घेण्यास सुरुवात करते. यामुळे ती आपल्या वरचढ झाली, अशी भावना पुरुषांची होते.
शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयातील दाखल बहुतांश प्रकरणांत पुरुषांचा पुनर्विवाह करण्याची इच्छा निघून जाते. ज्या पुरुषांना मुले आहेत, ते पोटगीतून त्यांचा खर्च भागवतात. ज्यांना मुले नाहीत ते दत्तक घेणे, याखेरीज बहीण तसेच भावाच्या मुलांचा सांभाळ करण्याचा पर्याय स्वीकारतात.
बर्याच प्रकरणात पोटगीची थकीत रक्कम इतकी जास्त असते की पुरुष ती भरण्यास असमर्थ असतात. त्यामुळे कोणालाही न सांगता पुरुष आई-वडील आणि संपूर्ण कुटुंबाला सोडून अज्ञातवासात निघून जातात नाहीत, अशीही अनेक प्रकरणे घडत असल्याची माहिती वकिलांनी दिली.
घटस्फोटानंतर पुरुष या गोष्टींना देतात प्राधान्य
अविवाहित 60 टक्के
पुनर्विवाह 15 टक्के
मुलांचा सांभाळ 15 टक्के
दत्तक मूल 10 टक्के
घटस्फोटाच्या प्रकरणात पत्नीपेक्षा पतीची वाट जास्त खडतर असते. पतीवर त्याचे कुटुंब, घटस्फोटित पत्नी तसेच मुलांची जबाबदारी असते. उच्च शिक्षितांमध्ये बहुतांश प्रकरणे परस्परसंमतीने मिटवण्याकडे कल असतो. तर, अन्य प्रकरणांत एकतर्फी घटस्फोट घेतले जातात. या वेळी कौटुंबिक हिंसाचार, पोटगी आदींचा सामना पुरुषवर्गाला करावा लागतो.- अॅड. इब्राहिम शेख, फौजदारी व कौटुंबिक वकील