वेल्हे: राजगड तालुक्यातील एक हजाराहून घरकुल लाभार्थ्यांना शासकीय अनुदान मिळालेले नाही त्यामुळे अनेकजण कर्जबाजारी झाले आहेत. तांत्रिक अडचणींचा फटका त्यांना बसला आहे. त्यामुळे त्यांचे मनरेगा अनुदान प्रस्ताव अपडेट होत नसल्याचे चित्र आहे.
सर्वात गंभीर स्थिती रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची आहे. या योजनेतील चाळीस हुन अधिक लाभार्थ्यांना पहिला पंधरा हजार रुपयांचा हप्ता मिळाला आहे. दुसरा व तिसरा हप्ता तांत्रिक अडचणींमुळे मिळालेला नाही. (Latest pune news)
या योजने अंतर्गत वेल्हे खुर्द दिघेआळी येथील दहा मागास कुटुंबानी घरकुलांची कामे सुरू केली आहेत. पंधरा हजार रुपयांत घराचा पायाही खोदता आला नाही. त्यामुळे एक लाख तीस हजार रुपयांचे अनुदान मिळण्याच्या आशेवर शंकर नथू जाधव, संजय नथू जाधव, प्रकाश दत्तू जाधव, सुरेखा चंद्रकांत ओव्हाळ, गणेश शंकर जाधव, शारदा रविकांत निकाळजे आदींनी कर्ज काढुन तसेच उसने पैसे घेऊन घरकुले बांधली आहेत. बहुतांश घरकुले अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, त्यांना वेल्हे येथील राजगड पंचायत समिती कार्यालयात हेलपाटे मारूनही अनुदान मिळालेले नाही. प्रकाश जाधव व शारदा निकाळजे यांना पहिला हप्ताही मिळालेला नाही.
प्रकाश जाधव म्हणाले, सर्व कागदपत्रे, बँक खाते क्रमांक देऊन आम्हाला पहिला हप्ताही दिला नाही. अधिकारी कर्मचारी उडवा उडवीची उत्तरे देत आहेत.पंतप्रधान आवास योजनेंतर्गतही जवळपास अकराशे लाभार्थ्यांना दुसरा व तिसरा हप्ता मिळाला नसल्याचे चित्र आहे.
या बाबत राजगड तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पंकज शेळके म्हणाले, रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना दुसरा व तिसरा हप्ता मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे लवकरच त्यांचा प्रश्न मार्गी लागेल .
विस्तार अधिकारी ललिता चौधरी म्हणाल्या, 2200 घरकुल लाभार्थ्यां पैकी निम्या लाभार्थ्यांची आँनलाईन प्रकिया पुर्ण झाल्याने त्यांना हप्ते मिळाले आहेत. उर्वरित लाभार्थ्यांची आँनलाईन प्रकिया पुर्ण करण्यात अडचणी येत असल्याने त्यांना दुसरा हप्ता मिळालेला नाही. यासाठी वरिष्ठ पातळीवर कार्यवाही सुरू आहे.