

पुणे: जातीनिहाय जनगणनेचा निर्णय केंद्राने घेतला असला, तरी त्याचे श्रेय काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनाच आहे, असा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी नुकताच येथे बोलताना केला.
जातीनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधीचा विजय आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी महात्मा फुले वाड्यात तो पेढे वाटून साजरा केला. ’झुकता है मोदी, झुकानेवाला राहुल गांधी चाहिये’, ’सामाजिक न्यायक्रांतीचे नवे जननायक राहुल गांधी’ अशा घोषणांचे फलक हाती घेऊन ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी या घोषणा दिल्या. प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रशांत सुरसे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. (Latest Pune News)
जातीनिहाय जनगणना व्हावी, याकरिता गेली 10 वर्षे राहुल गांधी संसदेत तसेच वेगवेगळ्या व्यासपीठांवर मागणी करत होते. भाजपच्या नेत्यांनी वेळोवेळी या मागणीची अवहेलना केली. पण, अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला ही मागणी मान्य करावी लागली. राहुल गांधी हे सतत सर्वसामान्य जनतेची बाजू लावून धरतात, असे मोहन जोशी यांनी या वेळी सांगितले.
अविनाश बागवे, सुनील मलके, प्रशांत सुरसे, अॅड. शाबीर खान, चेतन आगरवाल, रामदास मारणे, सुरेश कांबळे, प्रथमेश आबनावे, आयुब पठाण, स्वाती शिंदे, अनिता मकवाना, भावना बोराटे, पल्लवी सुरसे आदी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.