Illegal Liquor
Illegal Liquor File Photo
पुणे

Illegal Liquor| गोवा बनावटीच्या सव्वाकोटींच्या मद्यासह दीड कोटीचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

गोवा राज्यनिर्मित आणि महाराष्ट्रात विक्रीस परवानगी नसलेल्या दारूची होणारी तस्करी उघडकीस आणत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तब्बल १ कोटी ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. त्यामध्ये १ कोटी २८ लाख रुपये किमतीचा मद्यसाठा आहे.

खेड- शिवापूर भागात ही कारवाई करण्यात आली असून, सौंदर्यप्रसाधनाच्या आडून ही मद्याची तस्करी सुरू होती. याप्रकरणी सुनील चक्रवर्ती या चालकाला एक्साईज विभागाकडून अटक करण्यात आली आहे.

शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई केली जात आहे. तसेच शहरात अनेक हॉटेल, पबवर कारवाई करून त्यांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

यासाठी उत्पादन शुल्क विभागाची पथके गस्तीवर आहे. या दरम्यान खेड-शिवापूर गावच्या हद्दीतून गोवानिर्मित दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंग रजपूत यांना मिळाली.

त्यानुसार उत्पादन शुल्कच्या सासवड विभागाने सापळा रचून हॉटेल जगदंबसमोर एका संशयित ट्रकला अडविले. चालकाकडे चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय आल्याने पथकाने ट्रकची तपासणी केली.

त्या वेळी पाठीमागील बाजूस रॉयल ब्लू माल्ट व्हिस्कीचे २ हजारांहून अधिक बॉक्स आढळून आले. त्याची किंमत तब्बल १ कोटी २८ लाख १ हजार आहे. दारू आणि ट्रक असा सुमारे १ कोटी ५१ लाखांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला.

वाहनचालकाकडे मद्य वाहतुकीचे संदर्भातील कोणताही वाहतूक पास, परवाना अथवा कोणतीही कागदपत्रे मिळून आली नाहीत. त्यानुसार पथकाने चालकाला अटक केली. उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर,

पुणे अधीक्षक चरणसिंग रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक प्रदीप मोहिते, राम सुपेकर, रोहित माने, धवल गोलेकर, सागर दुर्वे, संदिप मांडवेकर यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

SCROLL FOR NEXT