पुणे

पुण्यातील सफाई कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

अमृता चौगुले

वाघोली(पुणे); पुढारी वृत्तसेवा : वाघोली येथे महापालिकेच्या आरोग्य विभागात काम करणार्‍या कामगारांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. कामगार सुरक्षिततेच्या साधनांविना काम करत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना तत्काळ सुरक्षेचे साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. वाघोली येथील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणार्‍या कामगारांची सुरक्षा धोक्यात आली आहे. मास्क, हँडग्लोज, गमबूट न वापरता ते ड्रेनेजच्या साफसफाईचे काम करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

कचरा संकलन, सफाईचे काम करताना सुरक्षा साधने नसतील, तर कामगारांना श्वसनविकास, त्वचाविकार, फुप्फुसाचे विकार जडू शकतात. पावसाळ्यात कचर्‍यात जिवाणूंचे प्रमाण अधिक असते. नाका व तोंडावाटे ते शरीरात गेल्यास संसर्ग होऊ शकतो. तसेच हँडग्लोजशिवाय कचरा संकलन केल्यास त्वचाविकारसुद्धा होऊ शकतो. बर्‍याचदा काम करताना कडक प्लास्टिक, लोखंडी वस्तूंचे तुकडे, काचांचे तुकडे यामुळे इजा होऊ शकते. यापूर्वीसुद्धा कामगारांना अशा धोकादायक वस्तूंमुळे हानी पोहचली आहे. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सफाई कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेणे प्रशासनाची जबाबदारी आहे. पूर्वी स्टोअरकडून सुरक्षिततेचे साहित्य मिळत होते; परंतु आता ते बंद करण्यात आले आहे. कामगारांना त्यांच्याच पगारातून दोन वर्षांतून एकदा साहित्य घेण्यासाठी पैसे देण्यात येतात. त्यांनी त्यांचे साहित्य घेऊन स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे.

– अनिल ढमाले,
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, महापालिका.

आरोग्य विभागाचे कामगार सुरक्षेच्या साधनांचा वापर न करता जीव धोक्यात घालून गटार साफसफाईचे काम करतात. त्यांच्या आरोग्याच्या
सुरक्षेकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने तत्काळ कामगारांना साहित्य उपलब्ध करून द्यावे; अन्यथा महापालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल.

– सागर गोरे,
सामाजिक कार्यकर्ते, वाघोली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT