पुणे

पुणे : पीएमपीत अधिकारी टिकेनात; कार्यकाळ संपायच्या आतच बदल्या

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपीएमएल) अधिकार्‍यांच्या कार्यकाळ संपायच्या आतच बदल्या होत असल्यामुळे पीएमपीएलच्या विकासाला खीळ बसली आहे. गेल्या पाच वर्षांत पाच अधिकार्‍यांनी पीएमपीचा कारभार पाहिला, त्या सर्वांचा कार्यकाळ संपण्याआधीच बदली झाली. आता कुठे पीएमपीच्या विकासाची गाडी रुळावर येत असतानाच पुन्हा पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे पीएमपी कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

काही महिन्यांपूर्वीच पीएमपीएलचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांची दिल्लीत नियुक्ती झाल्यावर ओम प्रकाश बकोरिया यांनी पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार स्वीकारला होता. अवघ्या नऊ महिन्यांत त्यांच्याकडून पीएमपीच्या आणि कामगारांच्या हिताची अनेक कामे होत होती. मात्र, त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच अचानक त्यांची बदली करण्यात आली आहे.

कामगारांमध्ये नाराजी

बकोरिया यांनी त्यांच्या कार्यकाळात कामगार हिताला प्राधान्य दिले होते. पीएमपीच्या तिजोरीत खडखडाट असतानाही त्यांनी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू केला. दरआठवड्याला बकोरिया हे कामगारांना भेटून त्यांच्या समस्या स्वत: लक्ष देऊन सोडवत असत. त्यामुळे त्यांनी कामगारांच्या मनात घर केले होते. आता बकोरिया गेल्यामुळे कामगारदेखील नाराज झाले आहेत.

पाच वर्षांत पाच अध्यक्ष…

पीएमपीएमएलला गेल्या पाच वर्षांत पाच अध्यक्ष मिळाले, यातील एकानेही आपला कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. तो पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली झाली. त्यामुळे पीएमपीचा विकासाच्या गाडीचा वेग मंदावला आहे. तुकाराम मुंडे यांची बदली झाल्यानंतर फेब—ुवारी 2018 ते जुलै 2020 या काळात नयना गुंडे यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. जुलै 2020 ते जून 2021 दरम्यान डॉ. राजेंद्र जगताप, जून 2021 ते जुलै 2021 डॉ. कुणाल खेमणार, जुलै 2021 ते ऑक्टोबर 2022 या काळात लक्ष्मीनारायण मिश्रा आणि ऑक्टोबर 2022 ते 6 जुलै 2023 या नऊ महिन्यांच्या काळात ओमप्रकाश बकोरिया यांनी काम पाहिले. आता पदभार स्वीकारणारे अधिकारी सचिंद्र प्रताप सिंग पीमपीएमएलमध्ये किती दिवस काम पाहणार आणि पुणेकरांच्या तसेच कामगारांच्या हिताचे काय निर्णय घेणार, याची उत्सुकता आहे.

प्रवाशांचे हित बघणारा, पीएमपीएमएलचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने पावले

उचलणारा, ठेकेदारांना शिस्त लावणारा अधिकारी इथे काम करू शकत नाही, हे बकोरियांच्या बदलीने पुन्हा एकदा सिद्ध झाले. राजकीय व्यक्ती आणि काही विशिष्ट प्रशासकीय व्यवस्थेकडून ठेकेदारांचे हितसंबंध जपण्यासाठीच अशा प्रशासकीय बदल्या केल्या जातात का, असा प्रश्न यानिमित्ताने पडतो आहे. येणार्‍या नवीन अधिकार्‍यास शुभेच्छा. – संजय शितोळे,
मानद सचिव, पीएमपी प्रवासी मंच.

बकोरिया यांनी पीएमपीत काम करताना नेहमीच कर्मचार्‍यांच्या हिताचे निर्णय घेतले. आम्हाला सातवा वेतन आयोग लागू केला. आमच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी नेहमी पुढाकार घेतलेला. प्रवाशांना चांगली सेवा मिळाली पाहिजे, असे ते आम्हाला नेहमी सांगत. त्यांच्या बदलीने दु:ख होत आहे. मात्र, निर्णय शासन पातळीवर घेतले जातात. नवीन अध्यक्षांचे आम्ही स्वागत करतो.

– सुनील नलावडे, सरचिटणीस,
पीएमपीएमएल राष्ट्रवादी काँग्रेस कामगार संघटना.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT