कात्रज: सुखसागरनगर अंबामाता चौक परिसरात अतिक्रमणांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यामुळे मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालक आणि नागरिक त्रस्त झाले आहेत.
परिसरातील रस्त्यांवर सकाळी आणि सायंकाळी अनधिकृत पथारी व्यावसायिक व्यवसाय करतात, याकडे महापालिका आणि वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. (Latest Pune News)
परिसरातील अतिक्रमणांबाबत वारंवार तक्रार करून प्रशासनाकडून ठोस कारवाई केली जात नाही. अनेकदा पाथारी आणि हातगाडी व्यावसायिकांना पूर्वसूचना देऊन कारवाई केली जात आहे. त्यामुळे कारवाईच्या वेळी हे व्यावसायिक आपल्या गाड्या बाजूला घेतात.
त्यानंतर प्रशासनाकडून केवळ कारवाईचा फार्स केला जात आहे. कारवाईनंतर काही वेळानंतर परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.
अतिक्रमणांबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत असतानाही प्रशासन ठोस भूमिका घेत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे प्रशासनाच्या कारभारवर नाराजी व्यक्त होत आहे. तसेच परिसरातील रस्त्यांवर वाहनांचे अनधिकृत पार्किंग केले जात आहे.
त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी आणखी अरुंद होत आहे. त्यात पीएमपीची बस आल्यावर संपूर्ण रस्ता व्यापला जातो. त्यामुळे अंबामाता चौक मोकळा श्वास कधी घेणार आणि अतिक्रमणमुक्त कधी होणार, असा सवाल रहिवासी श्रीराम कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे.
नागरिकांच्या काय आहेत मागण्या...
अनधिकृत पथारी व ठेले हटवावेत
पदपथ नागरिकांसाठी खुला करण्यात यावा
अनधिकृत पार्किंग करणार्या वाहनांवर कारवाई व्हावी
वाहतूक नियोजन सुधारावे
अतिक्रमण रोखण्यासाठी नियमित कारवाई करावी
अंबामाता परिसरातील नागरिकांना दररोज अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीमुळे ताणावाला सामोरे जावे लागत आहे. तक्रारी करूनही महापालिका व वाहतूक विभाग दुर्लक्ष करीत आहेत. अनेक वेळा पोलिसांची वाहनेही वाहतूक कोंडीत अडकत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रशासनाने परिसरातील अतिक्रमणे काढून वाहतूक कोंडीची समस्या तातडीने सोडविणे गरजेचे आहे.- मगराज राठी, रहिवासी
अंबामाता चौकातील अतिक्रमणांवर सातत्याने कारवाई केली जात आहे. मात्र, काही पथारीवाले पुन्हा त्या ठिकाणी व्यवसाय करताना दिसून येतात. ठोस कारवाई होत नसल्याने अतिक्रमण निरीक्षकांना नोटिसा बजावल्या आहेत.- राजेश कादबाने, सहायक आयुक्त, कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय