वडगाव शेरी: वडगाव शेरी परिसरातील हरिनगर येथील ओढ्यावर नवीन पूल बांधला आहे. मात्र, या पुलाच्या संरक्षक जाळ्या बसविल्या नसल्याने अपघात होण्याचा धोका आहे. त्यामुळे महापालिकेने या पुलाला तातडीने संरक्षक जाळ्या बसवाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
हरिनगर येथील ओढ्याला पावसाळ्यात मोठा पूर येतो. गेल्या वर्षी मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात या पुलाच्या संरक्षक जाळ्या तुटल्या होत्या. त्यामुळे महापालिकेने या ठिकाणी नवीन पूल बांधला असून, त्यावरून वाहतुकही सुरू झाली आहे, परंतु या पुलाला अद्यापही संरक्षक जाळ्या बसविण्यात आल्या नाहीत. (Latest Pune News)
या रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. अनेकदा किरकोळ अपघात होत आहेत. या पुलावर पथदिवेही नाहीत. त्यामुळे या पुलावर रात्री अधांर असतो. सरंक्षक जाळ्या नसल्याने यापूर्वी वाहने ओढ्यात पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. यामुळे महापालिका प्रशासन या पुलाला सरंक्षक जाळ्या कधी बसविणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
माजी स्वीकृत सदस्य सुधीर गलांडे म्हणाले की, हरिनगरच्या ओढ्याला पावसाळ्यात पूर येतो. कधी कधी पुलावरून पुराचे पाणी जाते. पुलावर संरक्षक जाळ्या बसविल्यास नागरिक सुरक्षित प्रवास करू शकतील.
परंतु जाळ्या नसल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. पुलाच्या परिसरात जाळ्या आणि इतर साहित्य ठेवले आहे. प्रशासनाने तातडीने सरंक्षक जाळ्या बसविण्याचे काम पूर्ण करणे गरजेचे आहे.
हरिनगर येथील ओढ्यावरील पुलाचे काम पूर्ण झाले असून, कठड्याची उंची वाढविण्यात आली आहे. या पुलाला लवकरच संरक्षक जाळ्या बसविल्या जाणार आहेत.
- मनोहर माळी, अधिकारी, पथ विभाग, महापालिका