Pune Dam Water Storage Today
खडकवासला: रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील पानशेत, वरसगाव धरण क्षेत्रात सोमवारी (दि. 23) सकाळपासून दमदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे खडकवासला धरण-साखळीत 0.43 म्हणजे जवळपास अर्धा टीएमसीची वाढ झाली. धरणसाखळीत सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 10.74 टीएमसी म्हणजे 36. 83 टक्के साठा झाला होता.
रविवारी (दि. 22) सायंकाळी पाच वाजता धरण साखळीत 10. 29 टीएमसी पाणी होते. गतवर्षीच्या तुलनेत धरण साखळीत अडिचपट जादा साठा आहे. गेल्या वर्षी 23 जुन 2024 रोजी धरण साखळीत 3.58 टीएमसी पाणी होते. (Latest Pune News)
दिवसभरात पानशेत येथे 20, वरसगाव येथे 22, टेमघर येथे 28 व खडकवासला येथे 3 मिलीमीटर पाऊस पडला रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील धरण क्षेत्रातील दासवे, तव, धामण ओहोळ, मोसे, शिरकोली आदी ठिकाणी दमदार पावसामुळे ओढे नाल्यांतुन धरणात पाणी येत आहे.
पानशेत खोर्यात सोमवारी सकाळी आठ ते दुपारी एक च्या दरम्यान चांगला पाऊस पडला. त्यानंतरही पावसाच्या सरी कोसळत होत्या. सिंहगड खडकवासला परिसरातही पावसाची रिमझिम होती.
खडकवासला धरण विभागाच्या शाखा अभियंता गिरीजा कल्याणकर म्हणाल्या, खडकवासलाची पाणी पातळी 61. 51 टक्क्यावर गेली आहे. खडकवासलातुन मुठा कालव्यात 352 तर मुठा नदीत 684 क्सुसेकने विसर्ग सुरू आहे. खडकवासला धरण साखळी एकूण पाणी साठवण क्षमता 29.15 टीएमसी इतकी आहे.