पुणे : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील (एनयूएचएम) कर्मचार्यांद्वारे Nशहरातील कुटुंबांचे सर्वेक्षण सुरू आहे. मात्र, उन्हातान्हात परिचारिकांना एकट्यानेच हे सर्वेक्षण करावे लागत आहे. त्यांना दारोदार जाऊन माहिती घेताना असुरक्षित वाटत असल्याने सोबत आणखी महिला सहकारी द्यावी, अशी मागणी होत आहे.
शहरात कुटुंबनियोजनाचे सर्वेक्षण सुरू आहे. त्यात किती कुटुंबे, घरांतील सदस्य, मुले, त्यांचे वय, पत्ता आदींची माहिती जमा केली जात आहे. ती शहराच्या आरोग्य विभागाकडे दिली जाते. एकीकडे शहराची लोकसंख्या वाढली आहे. या लोकसंख्येची माहिती गोळा करण्यासाठी फक्त 250 ते 300 महिला परिचारिका नेमण्यात आल्या असून, त्यांच्यावर ताण वाढला आहे. या महिला एकेकट्या फिरून 4 एप्रिलपासून माहिती घेत आहेत. त्यांना 30 एप्रिलपर्यंत सर्व कुटुंबांची माहिती गोळा करायची आहे. एका परिचारिकेला 15 हजार कुटुंबांची माहिती घेण्याचे लक्ष्य दिले गेले असून, त्यासाठी त्यांना रोज 100 घरांची माहिती घ्यावी लागत आहे. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत या परिचारिकांची संख्या कमी पडत असल्याने त्यांच्यावर कामाचाही अतिरिक्त ताण येत आहे.
माहिती घेताना वस्ती, झोपडपट्टीतील रहिवासी सहकार्य करतात आणि माहिती देतात. मात्र, याउलट उच्चभ्रू सोसायट्यांमधील सुशिक्षित रहिवाशांकडून वेगळा अनुभव त्यांना येतो. सोसायट्यांमध्ये माहिती घ्यायला गेल्यास गेटवरून आत न सोडणे, दार न उघडणे, पूर्ण माहिती न देणे; इतकेच नव्हे तर कुत्री अंगावर सोडणे, असे अनुभव त्यांना येत आहेत. एकटी महिला पाहून सोसायटीमधील रहिवाशांकडून गैरवर्तनदेखील झाल्याचे प्रकार घडले असल्याने त्यांनी एक महिला जोडीदार सोबत असावी, अशी मागणी या परिचारिकांकडून केली जात आहे.
महापालिकेकडून परिचारिकांची कायमस्वरूपी भरती करताना सध्या ज्या परिचारिका 'एनयूएचएम'अंतर्गत कार्यरत आहेत व ज्यांना कामाचा अनुभव आहे, त्यांचा विनाअट समावेश केला जावा. त्यानंतर परीक्षा घेऊन नवीन परिचारिकांची भरती करण्यात यावी. कामाच्या अनुभवाचा विचार करून हा निर्णय घेतला जावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
हे सर्वेक्षण करण्याबाबत जर कोणत्याही नर्सेसला अडचणी येत असतील, तर त्यांच्या मदतीसाठी वरिष्ठ नर्सेस, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी हे मदत करतात. हे काम एकट्याने करायचे असून, अडचण असल्यास वरिष्ठ अधिकारी पूर्ण सहकार्य करतो. या स्टाफसोबत जर कोणी गैरवर्तन करीत असेल, तर त्यांनी आमच्याकडे तक्रार करावी. संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाईल.
– डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे मनपा
https://youtu.be/wimwsVNgHnY