Recruitment Pudhari
पुणे

Maharashtra Non-Teaching Staff Recruitment: महाराष्ट्रात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया 21 वर्षांनी सुरू; नवीन निकष जाहीर

खासगी शाळांतील कनिष्ठ-वरिष्ठ लिपिक, प्रमुख लिपिक, ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहाय्यक पदांसाठी महाराष्ट्र शासनाने नवीन नियम 2026 अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू केली

पुढारी वृत्तसेवा

गणेश खळदकर

पुणे: शिक्षकेतर भरतीसाठी शासनाने आता पावले उचलली असून, शिक्षकेतर कर्मचार्‌‍यांची भरती करण्यासाठी नव्याने पात्रता तसेच निकष जाहीर केले आहेत. त्याला महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) (सुधारणा) नियम, 2026 असे संबोधण्यात येणार असून याच नियमांच्या आधारे भरती केली जाणार आहे. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेला तब्बल 21 वर्षांनी वेग येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये 2005 नंतर शिक्षकेतर पदांची भरती झालेली नाही. ही बंदी उठविण्यासाठी अनेक संघटनांनी लढा उभारला. त्यांच्या मागणीला 2019 च्या सुधारित आकृतीबंधाने आधार मिळाला आहे. परंतु, 2019 चा नवीन आकृतीबंध जाहीर करून शासन शांत राहीले. त्यानंतर आता 2026 मध्ये पुन्हा शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेसाठी नवीन निकष आणि पात्रतेसंदर्भात महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) (सुधारणा) नियम, 2026 बनविण्यात आला आहे. त्यानुसारच आता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.फ

पदभरतीसाठीचे नवीन निकष

  • कनिष्ठ लिपिक-विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा शासनाने समतुल्य म्हणून घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता; आणि टंकलेखन किंवा संगणक टंकलेखनातील शासनाने अधिकृत केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले मराठी टंकलेखनाची प्रतिमिनिट 30 शब्द किंवा इंग््राजी टंकलेखनाची प्रतिमिनिट 40 शब्द या गतीचे प्रमाणपत्र.

  • वरिष्ठ लिपिक-नियमित वेतनश्रेणीसह कनिष्ठ लिपिक हे पद धारण करणाऱ्या व त्या पदावर 3 वर्षांहून कमी नाही इतकी सेवा पूर्ण करणाऱ्या व्यक्तींमधून ज्येष्ठता-नि-गुणवत्ता या आधारावर सुयोग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने.

  • प्रमुख लिपिक-वरिष्ठ लिपीक हे पद धारण करणाऱ्या व या पदावर 3 वर्षांहून कमी नाही इतकी सेवा पूर्ण करणाऱ्या व्यक्तींमधून ज्येष्ठता-नि-गुणवत्ता या आधारावर सुयोग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने, ग््रांथपाल-सांविधिक विद्यापीठाची ग््रांथालय विज्ञान विषयातील पदवी किंवा मान्यताप्राप्त संस्थेच्या ग््रांथालय विज्ञान विषयाच्या पदविकेसह सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.

  • प्रयोगशाळा सहाय्यक-मान्यताप्राप्त परीक्षा मंडळातून इयत्ता 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण

  • शिपाई-मान्यताप्राप्त परीक्षा मंडळातून किमान 12 वी उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीमधून वेळोवेळी शासनाच्या मान्यतेने विभागाने विहीत केलेल्या धोरणानुसार अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती.

साधारण तीस हजार पदांची होऊ शकते भरती

राज्यातील शाळांमध्ये कनिष्ठ लिपिकांची 17 हजार 695 पदे, वरिष्ठ लिपिकांची 4 हजार 912 पदे, मुख्य लिपिकांची 923 पदे असतील. तर ग््रांथपालांची 2 हजार 118 पदे तर प्रयोगशाळा सहायक नववी ते दहावीची 4 हजार 685 पदे निर्माण होणार आहेत. सोबतच प्रयोगशाळा सहाय्यक उच्च माध्यमिक 2 हजार 40 पदेही यातून निर्माण केली जाणार आहेत. या निर्णयाने जेथे पदे रिक्त आहेत येथे भरतीसाठी संधी आली आहे.

राज्य शासनाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करत असताना त्यांच्या पात्रतेमध्ये बदल करत उच्चशिक्षित कर्मचारी मिळतील अशी व्यवस्था केली आहे. या निर्णयाचे स्वागतच आहे. परंतु, गेल्या 21 वर्षांपासून संबंधित कर्मचाऱ्यांची भरती काही ना काही कारणाने रखडलेली आहे. त्यामध्ये आता कोणताही व्यत्यय न आणता संबंधित भरती प्रक्रिया वेगाने राबविणे गरजेचे आहे.
शिवाजी खांडेकर, सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT