हडपसर मतदारसंघ परंपरा राखणार का? pudhari
पुणे

Maharashtra Assembly Polls: हडपसर मतदारसंघ परंपरा राखणार का?

Maharashtra Assembly Election 2024: हडपसरमध्ये आमदार रिपीट करण्याची परंपरा नाही. हीच परंपरा यावर्षीही हडपसरवासीय कायम ठेवणार का? याकडे लक्ष लागले आहे.

पुढारी वृत्तसेवा

सुनील जगताप

Pune Politics: हडपसर विधानसभा मतदारसंघ हा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. या मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत आमदार रिपीट करण्याची परंपरा नाही. हीच परंपरा यावर्षीही हडपसरवासीय कायम ठेवणार का? याकडे लक्ष लागले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनी वेग घेतला असताना हडपसर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळविण्यासाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांत, तर महायुतीत अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत चुरस असणार आहे. हडपसरची ही लढाई त्यामुळे रंगतदार होणार आहे.

हडपसर विधानसभा मतदारसंघ 2009 मध्ये नव्याने अस्वित्वात आला. या 2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे महादेव बाबर हे प्रथम आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे योगेश टिळेकर 82,629 मते मिळवून विजयी झाले.

शिवसेनेचे महादेव बाबर यांना दुसर्‍या क्रमांकाची मते मिळाली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चेतन तुपे 92,326 मते मिळवून विजयी झाले. या निवडणुकीत भाजपचे योगेश टिळेकर यांचा पराभव करून पुन्हा तोच आमदार देण्याचे हडपसरवासीयांनी टाळले आहे. त्यामुळे हडपसरमधील मतदार हीच परंपरा पुढे सुरू ठेवतील का? याबाबत सध्या चर्चा रंगली आहे.

महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेसला प्रत्येकी तीन, तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला दोन मतदारसंघ देण्याचे ठरविण्यात आले आहे. हडपसरमध्ये शिवसेनेचे महादेव बाबर हे माजी आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवार यांचीही भेट घेत हडपसर मतदारसंघावर दावा केला होता. मात्र, या मतदारसंघातून पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप इच्छुक आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर तुपे हे अजित पवार यांच्या गटात दाखल झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटातील प्रशांत जगताप यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रशांत जगताप या मतदारसंघातील संभाव्य उमेदवार असतील, असे संकेत दिले आहेत.

महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार चेतन तुपे यांचा या मतदारसंघावर दावा आहे, तर मित्रपक्ष शिवसेनेचाही या मतदारसंघावर डोळा आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे महायुतीमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसाठी हडपसर विधानसभा मतदारसंघ कळीचा ठरणार आहे.

शिवसेनेतील फुटीनंतर भानगिरे यांनी तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. गेल्या वेळीही निवडणूक लढविण्यासाठी ते आग्रही होते. भानगिरे यांनी त्यादृष्टीने मोर्चेबांधणीही केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असल्याने शिवसेनेकडूनही भानगिरे यांच्यासाठी हडपसर विधानसभा मतदारसंघाची मागणी होण्याची शक्यता आहे.

मनपाच्या या वॉर्डांचा समावेश

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश 2008 नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, हडपसर मतदारसंघात पुणे शहर तालुक्यातील येरवडा महसूल मंडळातील मुंढवा (पुणे पालिका वॉर्ड क्र. 130) आणि पुणे पालिकेच्या वॉर्ड क्र.17, 19 ते 23, 26, 131 ते 134, 137 ते 139 यांचा समावेश होतो.

वाहतूक कोंडीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न

या मतदारसंघामध्ये वाहतूक कोंडी हा मोठा जटिल प्रश्न असून, गेल्या पाच वर्षात हा प्रश्न सुटलेला नाही. त्याचबरोबर नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना पिण्याचे पाणी आणि कचर्‍याचा प्रश्नही मोठा आहे. त्यामुळे या निवडणुकीत वाहतूक कोंडी, कचरा आणि पाणी हे प्रश्न अधिक गाजणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT