पिंपरी(पुणे) : नसताना महापालिकेच्या वतीने मोशी येथे तब्बल 400 कोटी रुपये खर्चाची उधळपटी करून क्रिकेट स्टेडिमय बांधण्यात येत आहे. तसेच, नवीन पालिका भवन इमारतीचे काम सुरू आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च न करता गेल्या साडेतीन वर्षांपासून सुरू असलेला दिवसाआड पाणीपुरवठा बंद करून शहरवासीयांना दररोज पाणी द्या, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिका भवन प्रवेशद्वार व आयुक्त दालनासमोर शुक्रवारी (दि.21) धरणे आंदोलन केले.
गरज नसताना मोशीत 400 कोटी खर्च करून क्रिकेट स्टेडिमय बांधण्यात येत आहे. मात्र, नेहरूनगर येथील धोकादायक मगर स्टेडियम तोडून चार वर्षे झाली तरी, अद्याप तेथे नव्याने स्टेडिमय बांधण्यात आलेले नाही. त्यामुळे खेळाडूंची गैरसोय होत आहे. कोट्यवधीचा खर्च करूनही पालिकेच्या क्रीडांगणे व मैदानाची दुरवस्था झाली आहे. अनेक स्टेडिमय, क्रीडांगण, हॉल, टेनिस कोर्ट खासगी संस्थेच्या घशात घालण्यात आली आहेत. जलतरण तलावही खासगी संस्थांना देण्याचा घाट सुरू आहे.
पालिकेने निर्माण केलेल्या क्रीडांगण, स्टेडिमय व मैदानाची अशी अवस्था असताना नव्याने शहरात क्रिकेट स्टेडियमची गरज नाही. शहरातील सर्व मैदाने प्रथम दुरूस्त करून ती सुस्थितीत करावीत. अण्णासाहेब मगर स्टेडियम विकसित करण्याची गरज आहे. तसेच, गरज नसताना चिंचवड येथील ऑटो क्लस्टरसमोर 287 कोटी रुपये खर्च करून नवीन पालिका भवन उभारण्याचे काम सुरू आहे.
प्रशासकीय राजवटीत इतका मोठा खर्च करून स्टेडियम व नवीन पालिका भवन बांधण्याची कोणतीही तातडीची गरज दिसत नाही.
त्यापेक्षा शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सश्रम करून शहरवासीयांना दररोज पाणी द्या. नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. इतर गोष्टीवर भरमसाट खर्च करण्यापेक्षा पाणीपुरवठा सुधारण्यावर भर द्यावा.
रखडलेला पवना बंद जलवाहिनी प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणी करीत मनसेने आयुक्त दालनाबाहेर घोषणाबाजी केली. शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी विशाल मानकरी, रूपेश पटेकर, बाळा दानवले, राजू साळवे, अश्विनी बांगर, अनिता पांचाळ, अलेक्स मोझेस, नितीन चव्हाण, नारायण पठारे, देवेंद्र निकम, प्रतीक शिंदे, जयसिंग भाट व पदाधिकारी उपस्थित होते. या मागणीसंदर्भात अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.
हेही वाचा