रुग्णालये नावालाच सरकारी; पैशाविना नाही एकही तपासणी Pudhari
पुणे

Pune Hospitals: रुग्णालये नावालाच सरकारी; पैशाविना नाही एकही तपासणी

महापालिकेच्या आरोग्यसेवेला खासगीकरणाची लागण

पुढारी वृत्तसेवा

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे: शहरातील लाखो गरीब आणि गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये मोफत प्राथमिक आरोग्यसेवा पुरविल्या जात आहेत. मात्र, हृदयविकार, किडनीचे आजार, आरोग्य तपासण्या, अशा आरोग्यसेवा पुरविण्यासाठी महापालिकेने खासगीकरणाच्या कुबड्या घेतल्या आहेत.

महापालिकेच्या बर्‍याच रुग्णालयांमध्ये आरोग्यसेवा ‘पीपीपी’ किंवा ‘डीबीओटी’ तत्त्वावर पुरविल्या जात आहेत. महापालिकेचे मर्यादित बजेट, मनुष्यबळाचा अभाव, महागडी साधनसामग्री आणि वाढती लोकसंख्या पाहता सध्यातरी खासगीकरणाला पर्याय नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. (Latest Pune News)

डॉक्टरांची वेतनश्रेणी, साधनसामग्रीची उपलब्धता न होणे, अशा विविध कारणांमुळे पीपीपी तत्त्वावर भर दिला जात असल्याचे सांगितले जात आहे. कमला नेहरू रुग्णालय, राजीव गांधी रुग्णालय, सुतार दवाखाना, बाणेरचे नवीन रुग्णालय आणि वारजे येथील बराटे हॉस्पिटल, अशा रुग्णालयांमध्ये खासगी एजन्सीच्या माध्यमातून निदान आणि उपचारांच्या सुविधा उपलब्ध आहेत.

खासगी रुग्णालयांच्या तुलनेत महापालिकेच्या रुग्णालयांमधील दर कमी असले, तरी ते गरीब रुग्णांना परवडणारे नसतात. त्यामुळे एकतर त्यांना ससूनला पाठवले जाते किंवा ‘उद्या या, परवा या’, अशी कारणे दिली जातात.

कमला नेहरू रुग्णालय, राजीव गांधी रुग्णालय, सुतार दवाखाना, अशा महापालिकेच्या मुख्य रुग्णालयांमध्ये अनेक आरोग्यसेवांचे खासगीकरण झाले आहे. त्यामुळे गरीब रुग्णांना दर परवडत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तिन्ही रुग्णालयांमधील आरोग्यसेवेला खासगीकरणाची लागण झाल्याचे दैनिक ‘पुढारी’ने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे.

कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ

कमला नेहरू रुग्णालयाच्या केसपेपर खिडकीजवळ भलीमोठी रांग... वडिलांचे एमआरआय करायचे आहे आणि त्यासाठी किती खर्च येईल, याबाबत खिडकीवर चौकशी केली. या वेळी दरपत्रक पहा असे सांगण्यात आले आणि डॉक्टरांना दाखवल्याशिवाय नेमका खर्च सांगता येणार नाही, असेही तेथील कर्मचार्‍याने सांगितले.

दरपत्रकावर 2000 ते 5000 दरम्यान खर्चाची रेंज लिहिण्यात आली होती. गरीब रुग्णांना एवढा खर्च तरी परवडेल का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला. कमला नेहरू हॉस्पिटलमधील रुग्णसेवाच ’व्हेंटिलेटर’वर आहे. तेथील जवळपास सर्वच विभागांचे खासगीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि गरीब रुग्णांना महापालिकेचे रुग्णालय असतानाही आर्थिक लूट होताना दिसून येत आहे.

रुग्णालयात सी. टी. स्कॅन, हृदयरोग तपासणी, एक्स-रे, सोनोग्राफी, बालरोग विभाग, शस्त्रक्रिया, अत्याधुनिक आयसीयू, अस्थिरोग अशा विविध सेवा सुरू करण्यात आलेल्या आहेत. रुग्णालयामध्ये रक्ताचे विविध नमुने तपासण्यासाठी 26 रुपयांपासून 1692 रुपयेहून अधिक पैसे आकारले जात आहेत. डोक्याचा सीटी स्कॅनसाठी 973 रुपये, आतड्यांचा सीटी स्कॅनसाठी तब्बल 6 हजार 486 रुपये तर छातीच्या सीटी स्कॅनसाठी 4 हजार 865 रुपये आकारले जात आहेत. विविध प्रकारच्या एमआरआयसाठी 2 हजार 162 रुपयांपासून 5 हजार 405 रुपये दर आकारले जात आहेत.

शंकरराव धोंडिबा सुतार मल्टिस्पेशालिटी रुग्णालय

पायाला दुखापत झाल्यामुळे एका खासगी डॉक्टरांनी मला खासगी तपासणी केंद्राऐवजी सुतार रुग्णालयात जाऊन सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला होता. डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन दाखवल्यानंतर सीटी स्कॅन साडेतीन हजार रुपयांमध्ये करण्यात आले. खासगी डायग्नोस्टिक सेंटरमध्ये यासाठी आठ हजार रुपये आकारले जात असल्याचे समजले.

सुतार रुग्णालयातील शुल्क तुलनेने कमी होते. तरीही सर्वसामान्य नागरिकांना हे दर परवडणारे नाहीत, अशी भावना शिरवळ येथील मूळ रहिवासी असलेले आणि सध्या गणपती माथा येथे राहणारे प्रसाद ढमाळे यांनी व्यक्त केली. कोथरूड येथील शंकरराव धोंडिबा सुतार मल्टिस्पेशालिटी रुग्णालयामध्ये असलेल्या क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटरमार्फत रुग्णांना विविध प्रकारच्या सेवा पुरवल्या जात आहेत.

या सेंटरमध्ये साध्या रक्त तपासणीपासून ते अगदी आधुनिक अशा एमआरआय आणि सीटी स्कॅनसारख्या चाचण्यांची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, त्यासाठी गरीब रुग्णांना पदरमोड करावी लागत आहे. रुग्णालयाच्या दर्शनी भागात डायग्नोस्टिक सेंटरचे दरपत्रक स्पष्टपणे लावण्यात आले आहे, ज्यामुळे रुग्णांना तपासण्यांचे शुल्क सहजपणे पाहता येते.

सेंटरमधील कर्मचारी रुग्णांकडून सर्वप्रथम डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रिप्शन मागतात. त्यानंतर, डॉक्टरांनी सुचवलेल्या तपासण्या केल्या जातात. एमआरआय आणि सीटी स्कॅनसाठी दोन हजार ते नऊ हजार या दरम्यान शुल्क आकारले जाते. सीटी स्कॅन आणि एमआरआयचे दर अजून कमी करण्याची आवश्यकता रुग्णांनी व्यक्त केली.

एमआरआय, सोनोग्राफी अन् सीटी स्कॅनचे शुल्क करावेत कमी

पौड रस्ता भागात राहणार्‍या माया प्रमोद पलंगे यांनी देखील त्यांचे अनुभव सांगितले. गेल्या वर्षी त्यांनी याच रुग्णालयातून विविध वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या होत्या. खासगी डॉक्टरांनी त्यांना एच1 बीसीची चाचणी आणि एक्स-रे काढण्यास सांगितले होते. सुतार रुग्णालयातील डायग्नोस्टिक सेंटरमध्ये एच1 बीसीसाठी 146 रुपये आणि एक्स-रे साठी 119 रुपये इतके कमी शुल्क आकारले गेले. खासगी डायग्नोस्टिक सेंटरच्या तुलनेत हे शुल्क खूप कमी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. फक्त एमआरआय, सोनोग्राफी आणि सीटी स्कॅनचे शुल्क जास्त असून ते कमी करायला हवेत,अशी त्यांचीही मागणी आहे.

राजीव गांधी रुग्णालय, येरवडा

वेळ सकाळी सव्वादहाची... मधुमेहामुळे किडनी निकामी झालेल्या रुग्णाचा एक नातेवाईक येरवडा येथील भारतरत्न राजीव गांधी रुग्णालयात दाखल होतो. ’डायलिसीस’ची माहिती घेत तो रुग्णालयातील पहिल्या मजल्यावरील केंद्रावर पोहोचतो. या वेळी डायलिसीससाठी 950 रुपये तर त्यावेळी लागणार्‍या किटसाठी 800 रुपयांचा खर्च होत असल्याची माहिती दिली जाते. महापालिकेचा दवाखाना असलेल्या याठिकाणी मुळात 400 रुपयांत डायलिसीस होणे आवश्यक असताना त्याला अतिरिक्त पैसे सांगून लुबाडण्याचा प्रकार सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

येरवडा येथील मुख्य चौकात असलेल्या चारमजली सुसज्ज रुग्णालयात कोठारी चॅरिटेबल ट्रस्टद्वारे डायलिसीस सेंटर चालविण्यात येते. त्यास ’दै. पुढारी’च्या प्रतिनिधीने भेट दिली असता शासकीय दरापेक्षा जास्त दराने शुल्क आकारण्यात येत असल्याचे दिसून आले. ’डायलिसीस’साठी येणार्‍या रुग्णाला एचआयव्ही, कावीळ अथवा हिपॅटायटिस पॉझिटिव्ह रुग्णांसाठी रुग्णालयात जागा नाही.

एचआयव्ही असलेल्या रुग्णांचेच डायलिसीस करता येणार असल्याची माहिती दिली जात असून, डायलिसीससाठी येताना रक्ताचे रिपोर्टही आणण्याचे नमूद करण्यात येत आहे. याखेरीज, रुग्णालयात भारत डायग्नोस्टिक्सतर्फे एम.आर.आय. स्कॅन, सी.टी.स्कॅन, एक्स-रे, सोनोग्राफी, ब्लड टेस्ट याखेरीज अन्य हेल्थ चेकअप आदी सवलतींच्या दरात उपलब्ध असल्याचे दिसून आले.

मोफत उपचार हवेत? नगरसेवकांना भेटा

शहरातील गरीब रुग्णांना परवडणार्‍या दरात आरोग्य सेवा मिळावी, यासाठी महापालिकेच्या वतीने शहरी गरीब योजनेअंतर्गत वैद्यकीय सुविधेमध्ये सवलत देण्यात येते. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये त्यामार्फत मोफत सुविधा मिळते. त्याची माहिती देताना केंद्रातील कर्मचार्‍यांनी रुग्णालयातील जनसंपर्क कक्ष अथवा महापालिकेकडे संपर्क साधण्याचा सल्ला देण्याऐवजी येथील माजी नगरसेवकाकडे जाण्याचा सल्ला देत आहेत.

कोणत्या सेवांचे खासगीकरण?

  • सोनोग्राफी, एक्स-रे, एमआरआय

  • डायलिसिस

  • हृदयविकारावरील उपचार

  • आयसीयू सुविधा

  • विविध शस्त्रक्रिया

खासगीकरणामुळे उपचार झाले महाग!

खासगी रुग्णालयांच्या तुलनेत महापालिकेच्या रुग्णालयांमधील दर निम्मे असले, तरी हातावर पोट असणार्‍या आणि रोजंदारीवर उदरनिर्वाह करणार्‍या गरीब रुग्णांना तेवढाही खर्च परवडत नाही. त्यामुळे त्यांना दर्जेदार आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. महापालिका अंदाजपत्रकामध्ये सार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्यावर भर देण्याऐवजी कायम खासगीकरणाला हवा दिली जात आहे.

आरोग्य सुविधा खासगी एजन्सीच्या ताब्यात दिल्यामुळे एकतर रुग्णांना ससूनकडे धाव घ्यावी लागते; अन्यथा आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे आम्हाला आरोग्याचा मूलभूत हक्क नाही का, असा प्रश्न रुग्णांकडून विचारला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT