

10 percent wage increase for sugar workers
पुणे: राज्यातील साखर कामगारांच्या वेतनवाढीबाबत ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी दिलेला वाढीचा प्रस्ताव साखर कारखाना मालक प्रतिनिधी आणि साखर कारखाना कामगार प्रतिनिधी यांनी उभयपक्षी मान्य केला आहे. त्यानुसार कामगारांच्या प्रचलित वेतनात 10 टक्के वाढ देण्याच्या तोडग्यास मान्यता मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
राज्यात साखर कारखाना कामगारांच्या वेतनवाढीबाबत त्रिपक्षीय समितीच्या माध्यमातून मार्ग काढला जातो. सन 2019 ते 2024 या पाच वर्षांच्या कराराचा कालावधी 31 मार्च 2024 होता आणि मुदत संपल्याने नवीन करार सन 2024 ते 2029 या कालावधीसाठी करण्याच्या दृष्टीने त्रिपक्षीय समितीची स्थापना राज्य सरकारमार्फत करण्यात आली होती. (Latest Pune News)
त्यामध्ये साखर कारखान्यांचे मालक प्रतिनिधी, साखर कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि शासन प्रतिनिधी अशी ही त्रिपक्ष समिती स्थापन होऊन त्यांच्या एकूण चार बैठका संपन्न झाल्या होत्या.कामगार संघटनांनी वेतनवाढीमध्ये 18 टक्के वाढीची मागणी केली होती, तर साखर कारखान्यांनी वेतनवाढ रास्त असावी, अशी आग्रही भूमिका घेतली होती.
मध्यंतरी उभयपक्षी निर्णय होत नसल्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा लवाद जो निर्णय देईल, तो मान्य करण्याचे ठरले होते. त्यानुसार सोमवारी (दि.14) साखर कारखाना कामगार प्रतिनिधी आणि साखर कारखाना मालक प्रतिनिधी, शासन प्रतिनिधींमध्ये मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक होऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला.
शरद पवार यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले व साखर उद्योगाची परिस्थिती, कारखान्यांची स्थिती, कामगारांची आवश्यकता या सर्व बाबींचा साकल्याने विचार करून 10 टक्के वाढ ही दोन्ही पक्षांनी मान्य करण्याचा विचार करावा, असा प्रस्ताव ठेवला व त्यास सर्वांनी मान्यता दिल्याची माहिती राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी कळविली आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी साखर कामगारांच्या वेतनात दहा टक्के दरवाढीचा दिलेला निर्णय मान्य केला असून, याचा लाभ राज्यातील सुमारे दीड लाख साखर कामगारांना होणार आहे. साखर कामगारांच्या इतरही काही मागण्या प्रलंबित आहेत. येत्या 23 जुलै रोजी त्रिपक्षीय समितीची पुढील बैठक होणार असून, या मागण्यांवर निश्चित सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर करार होईल.
- तात्यासाहेब काळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ