- ज्ञानेश्वर चौतमल पुढारी
Pune Muncipal Elections 2026: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील युतीबाबत संभ्रम कायम असल्याचं चित्र आहे. सध्या तरी पुण्यात युती होणार नाही, असा सूर शिंदे गटाकडून आहे. युतीच्या फॉर्म्युल्यावर मुंबईत काल रात्री उशिरापर्यंत खलबतं सुरू होती; मात्र घोषणा अपेक्षित असतानाच मध्यरात्री 12 वाजताची पत्रकार परिषद ऐनवेळी रद्द करण्यात आली.
सूत्रांच्या माहितीनुसार, पुण्यातील शिवसेना (शिंदे गट) नेते स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. त्या अनुषंगाने रात्री 12 वाजता पत्रकार परिषदेत तशी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता होती. मात्र ठाण्यातून “थोडं थांबा” असा निरोप आल्यानंतर शेवटच्या क्षणी ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आली. त्यामुळे युतीबाबतचा गोंधळ अधिकच वाढला आहे.
दरम्यान, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “आज साडेदहापर्यंत उदय सामंत पुण्यात पोहोचतील. सर्व उमेदवारांना वेळेत एबी फॉर्म दिले जातील. भाजप-सेना जागावाटपाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.” कोणासोबत जायचं, युती किंवा आघाडी होईल का? या प्रश्नांवर त्यांनी सध्या बोलणं टाळलं आहे, मात्र “काही वेळात चित्र स्पष्ट होईल” असं सूचक वक्तव्य केलं.
आज पुण्यात उदय सामंत, नीलम गोऱ्हे, विजय शिवतारे आणि शहराध्यक्ष नाना भानगिरे यांची बैठक होणार असून, त्यात पुढील रणनीती ठरण्याची शक्यता आहे. उमेदवारांचे फॉर्म, प्रचाराची दिशा आणि युतीचा पर्याय, या सर्व मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकंदरीत, पुणे महापालिकेसाठी भाजप-शिवसेना (शिंदे गट) युती अद्याप झालेली नाही. मध्यरात्रीची रद्द झालेली पत्रकार परिषद, ठाण्यातून आलेला ‘थांबा’चा फोन आणि आजची महत्त्वाची बैठक, या घडामोडींमुळे पुण्यातील राजकीय चित्र काही तासांत बदलू शकतं, असे संकेत मिळत आहेत.