Online Application Pudhari
पुणे

NMMS Exam 2026-27: एनएमएमएस परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू; ७ ऑक्टोबरपर्यंत नियमित शुल्काची मुदत

विलंब शुल्कासह ८ ते १४ ऑक्टोबर, तर अतिविलंब शुल्कासह १५ ते २१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार; परीक्षा २० डिसेंबरला

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा अर्थात एनएमएमएस परीक्षेसाठी ऑनलाइन आवेदनपत्रे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमार्फत ऑनलाइन अर्ज भरता येणार असून, नियमित शुल्कासह दि. ७ ऑक्टोबर, विलंब शुल्कासह ८ ते १४ ऑक्टोबर आणि अतिविलंब शुल्कासह १५ ते २१ ऑक्टोबरदरम्यान अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ https:///202.mscenmms.in/ वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने आवेदन करता येणार आहे.

वार्षिक उत्पन्न ३ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक

एनएमएमएस परीक्षेसाठी महाराष्ट्रातील शासकीय, शासनमान्य अनुदानित किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीत नियमित शिक्षण घेणारे विद्यार्थी पात्र आहेत. विद्यार्थ्याच्या पालकांचे आई-वडील दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न ३ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्याने इयत्ता सातवीत किमान ५५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण असावे.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी सातवीतील किमान गुणांची अट ५० टक्के आहे. विनाअनुदानित शाळा, केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय आणि सैनिक शाळेतील विद्यार्थी तसेच काही शासकीय वसतिगृह सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र नाहीत. अर्जाची प्रक्रिया शाळेच्या लॉगिनमधून केली जाणार असून विद्यार्थ्याचा फोटो व स्वाक्षरी, शैक्षणिक माहिती, जात संवर्ग, पालकांचे उत्पन्न, पत्ता, परीक्षा माध्यम आणि आवश्यक बँक तपशील आदी माहिती अचूक भरावी लागणार आहे.

एनएमएमएस परीक्षा २० डिसेंबरला...

एनएमएमएस २०२६-२७ परीक्षा २० डिसेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. यावेळी बौद्धिक क्षमता चाचणी आणि शालेय क्षमता चाचणी असे दोन पेपर घेतले जाणार आहेत. दोन्ही पेपर प्रत्येकी ९० गुणांचे व ९० प्रश्नांचे असून, प्रत्येकासाठी ९० मिनिटांचा कालावधी असेल.

बौद्धिक क्षमता चाचणी परीक्षा सकाळी १०.३० ते १२.०० आणि शालेय क्षमता चाचणी परीक्षा दुपारी १.३० ते ३.०० या वेळेत होणार आहे. दोन्ही विषय मिळून सर्वसाधारण विद्यार्थ्यांना पात्रतेसाठी किमान ४० टक्के, तर एससी, एसटी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना ३२ टक्के गुण आवश्यक आहेत. ही परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू आणि कन्नड या सात माध्यमांत घेण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT