पुणे

पिंपरी : काळ्या यादीतील ठेकेदाराला निर्मल वारीचे काम

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी निर्मल वारीचे काम काळ्या यादीत समाविष्ट केलेल्या ठेकेदाराला दिल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. दुसरीकडे, पालखी सोहळ्यादरम्यान फिरत्या शौचालयाचे योग्य प्रकारे नियोजन संबंधित ठेकेदाराने न केल्याने भाविकांची गैरसोय होत आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते शुभम वाळुंजकर यांनी केला आहे. संबंधित कामाबाबत शंका उपस्थित करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे.

दरवर्षी पालखी सोहळ्यासाठी भाविकांच्या सोयीसाठी फिरत्या शौचालयांचे नियोजन पुणे जिल्हा परिषदेकडून होत असते. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान तीर्थक्षेत्र देहू येथून होत असताना भाविकांच्या सुविधेासाठी 7 ते 10 जून असे 4 दिवस दररोज 1 हजार शौचालय पुरवणे ठेकेदारावर बंधनकारक होते. कामाच्या आदेशानुसार पुढील मुक्कामी एक दिवस आधी म्हणजेच दुपारी चारपर्यंत शौचालयांची उभारणी व अनुषंगिक सेवा उपलब्ध करणे गरजेचे असते; परंतु ठेकेदाराने सर्व एक हजार शौचालय पुरवले नाहीत, असे वाळुंजकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.

देहू मुक्कामी सुरुवातीचे दोन दिवस शौचालयांची उभारणी करण्यात आली नव्हती. देहूतील ग्रामस्थांनी आपल्या घरातील शौचालय नागरिकांसाठी खुले केल्यामुळे वारकर्‍यांची गैरसोय टळली. शासन प्रति शौचालय 2 हजार 500 रुपये याप्रमाणे दररोज एक हजार शौचालयासाठी एकूण 25 लाख रुपये खर्च देणार आहे.

निविदा प्रक्रिया वादात

निर्मल वारीचे गेल्या काही वर्षांपासून काम करणार्‍या ठेकेदारांना यंदाच्या निविदाप्रक्रियेत बाद ठरविण्यात आले. काळ्या यादीत समाविष्ट असणार्‍या कंपनीला निविदा बहाल केली आहे. ती कंपनी एका नगरपालिकेने काळ्या यादीत टाकली आहे, असे असताना राज्यात इतर कोणत्याही ठिकाणी काम करू शकत नाही. त्या कंपनीला निविदा दिल्यामुळे इतर ठेकेदारांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. याबाबत अंतिम सुनावणी प्रतीक्षेत असताना निर्मल वारीत सुविधा पुरवली जात नसल्याची तक्रार शुभम वाळुंजकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT