समीर भुजबळ
वाल्हे : पुरंदर तालुक्यातील नेहमीच चर्चेत असलेल्या निरा-कोळविहीरे जिल्हा परिषद गटातील असलेले दोन्ही पंचायत समिती गण हे महिलांसाठी आरक्षित झाल्याने अनेक पुरुष इच्छुकांनी ‘प्लॅन बी’ अंमलात आणला आहे. आपली पत्नी, मुलगी अथवा जवळच्या नातेवाईक महिलांना मैदानात उतरवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. निरा-वाल्हे गण एस. सी. महिलांसाठी आरक्षित आहे तर, दुसरा कोळविहिरे-गुळूंचे हा गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहेत.(Latest Pune News)
जिल्हा परिषद गटात आणि पंचायत समिती गणात अपेक्षित आरक्षण न पडल्यामुळे, जे स्वतः निवडणूक लढवण्यासाठी सज्ज होते.त्यांना आता नाइलाजाने माघार घ्यावी लागली आहे. सक्रिय राजकारणातून बाहेर न जाता या इच्छुकांनी आपल्या घरातील महिलांना उमेदवारी कशी मिळेल यांची चाचपणी सुरू असून, अप्रत्यक्षपणे निवडणुकीच्या रिंगणात कायम राहण्याचा मार्ग स्वीकारला आहे.
निरा-कोळविहिरे जिल्हा परिषद गटात सलग 25 वर्ष राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होत होता, परंतु 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेने येथे बाजी मारली होती. आता हा गट पुन्हा मिळविण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील असून शिवसेना शिंदे गट आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. कॉंग्रेस नेते माजी आमदार संजय जगताप भाजपमध्ये गेल्याने भाजपही टक्कर घेण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उबाठा, आप, मनसे असे सात व काही अपक्ष उमेदवार रिंगणात उतरतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे
2017 साली पुरंदर तालुक्यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या पंचायत समितीच्या 8 पैकी 6 जागा जिंकून शिवसेनेने पुरंदर तालुक्यात एकतर्फी विजय मिळवला आहे. तत्कालीन भाजप, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना या ठिकाणी धक्का बसला होता.
निरा-वाल्हे पंचायत समिती गण हा एस.सी. महिला आरक्षित आहे.या गणातून भाजप कडून निरेच्या माजी उपसरपंच वंदना बाळासाहेब भोसले, सुवर्णा सूर्यकांत कांबळे, शिवानी प्रशांत पाटोळे, मीनाक्षी रमेश भालेराव, शिवसेनाच्या मोनिका स्वप्निल कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून वाल्हे येथील अर्चना किरण भोसले तसेच भोसले परिवारातील महिला सदस्यांच्या दाखल्याची जुळवाजुळव सुरू आहे.
कोळविहीरे-गुळूंचे गण हा सर्वसाधारण महिला आरक्षित आहे. या गणातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून दिशा कांचन निगडे, राजलक्ष्मी पृथ्वीराज निगडे, नीता संतोष निगडे, लता रमेश जाधव, सीमा विजय निगडे, पूजा अक्षय निगडे, भाजपकडून सानिका अजिंक्य टेकवडे, निर्मला उत्तम निगडे, वर्षा महेंद्र माने, शिवसेनेच्या भारती अतुल म्हस्के, स्वप्नाली विराज निगडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुलभा अजित निगडे, नीता सोमनाथ खोमणे, अंजना बापू भोर या प्रबळ दावेदार आहेत.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत कोळविहीरे-गुळूंचे गणातून शिवसेनेचे अतुल म्हस्के व निरा-वाल्हे गणातून गोरखनाथ माने विजयी झाले होते. हे पंचायत समितीचे दोन्ही गण हे मागील पंचवार्षिक वगळता पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिलेले आहेत. ते पुन्हा ताब्यात मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्हा परिषद व पंचायत समिती गटात मोठी ताकद लावणार असल्याची चर्चा आहे.