समीर भुजबळ
वाल्हे : पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठा निरा-कोळविहीरे जिल्हा परिषद गट हा मागील 2017 च्या निवडणुकीप्रमाणेच यंदा देखील नागरिकांचा मागासवर्ग (महिला) आरक्षीत झाला आहे. सलग 25 वर्ष राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ अपवादात्मक म्हणजेच मागील 2017 मध्ये येथे शिवसेनेने बाजी मारली होती. हा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रयत्नशील झाली आहे. यातच शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (उबाठा), आप, मनसे असे सात व काही अपक्ष उमेदवार रिंगणात उतरतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. एकूणच यंदा देखील ही निवडणूक चुरशीची होण्याचे संकेत आहेत.(Latest Pune News)
सन 2017 मध्ये पुरंदर तालुक्यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या जिल्हा परिषदेच्या 4 गटांपैकी 3 ठिकाणी तर पंचायत समितीच्या 8 पैकी 6 जागा जिंकून शिवसेनेने पुरंदर तालुक्यात एकतर्फी विजय मिळविला आहे. तत्कालीन भाजप, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना या ठिकाणी धक्का बसला होता. त्यावेळच्या अखंड राष्ट्रवादी काँग्रेसची अंतर्गत बंडाळी व गटबाजीचा फायदा शिवसेनेला व काही ठिकाणी काँग्रेसला झाला होता. जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या नीरा-कोळविहीरे गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे ताकदवान नेते प्रा. दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार अशोक टेकवडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विराज काकडे, माजी सभापती बापू भोर, प्रदेश सदस्य कांचन निगडे, सोमेश्वरचे संचालक दिलिप थोपटे, सलग तीन पंचवार्षिक जिल्हा परिषद सदस्य व विविध विभागाचे सभापतीपद असणारे निरेचे चव्हाण परिवारातील सदस्यांसारखे दिग्गज नेते असताना शिवसेनेने बाजी मारली होती.
या निवडणुकीत शिवसेनेच्या शालिनी पवार विजयी झाल्या होत्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या तेजश्री विराज काकडे यांचा पराभव केला होता. निरा-कोळविहीरे गटात ओबीसी महिला आरक्षण आले आहे. या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निरेच्या सरपंच तेजश्री विराज काकडे, निकिता योगेश ननवरे, भाजपाकडून ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सचिन लंबाते यांच्या पत्नी वाल्हे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच समाज्ञी सचिन लिंबाते, माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या सूनबाई सानिका अजिंक्य टेकवडे, सीमा संदीप धायगुडे, हेमा उमेश चव्हाण, राधाबाई माने, शिवसेनेकडून भारती अतुल म्हस्के, सुजाता वसंतराव दगडे, तेजस्विनी गणेश गडदरे, ज्योती सागर भुजबळ हे संभाव्य उमेदवार जातीचे दाखले मिळवून आपल्या पक्षांकडे उमेदवारीची मागणी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून चव्हाण कुटुंबातील महिलांच्या दाखल्याची, जिंकून येणाऱ्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.