Nira Basin Water Storage Pudhari
पुणे

Nira Basin Water Storage: निरा खोऱ्यातील धरणांत 90 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

भाटघर, नीरा-देवघर, वीर, गुंजवणी धरणे भरली; शेती व पिण्याच्या पाण्याची टंचाई पूर्णतः दूर

पुढारी वृत्तसेवा

काटेवाडी: निरा खोऱ्यातील धरणांमध्ये यंदा समाधानकारक पावसामुळे मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला असून, शेती व पिण्याच्या पाण्यासाठी निर्माण होणारी टंचाई पूर्णतः दूर झाली आहे. नीरा खोऱ्यातील भाटघर, नीरा-देवघर, वीर आणि गुंजवणी या चारही धरणांची एकूण साठवणक्षमता 49 टीएमसी असून, सध्या त्यामध्ये 43.843 टीएमसी म्हणजेच 90.72 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

गतवर्षी याच कालावधीत या धरणांमध्ये 41.379 टीएमसी पाणी होते. त्या तुलनेत यंदा सुमारे 5.10 टक्क्यांनी अधिक साठा आहे. यावर्षी पावसाळ्यात भाटघर, निरा-देवघर आणि वीर ही तीन प्रमुख धरणे 100 टक्के भरल्यामुळे पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे पुणे व सातारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या तसेच पिण्याच्या पाण्याच्या गरजा सहजपणे भागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

निरा खोऱ्यातील मुबलक पाणीसाठ्यामुळे अनेक गावांमध्ये सहकारी उपसा सिंचन योजनांद्वारे पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा अवलंब करून फळबागा विकसित केल्या असून, यंदा त्यांना पाण्याची कमतरता भासणार नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही वेळेवर व पुरेसे पाणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या पाणीसाठ्याचा लाभ गहू, हरभरा, टोमॅटो, कांदा, वेलवर्गीय पिके, भाजीपाला, मका तसेच चारापिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. काढणीनंतर कडवळ, मका व घास आदी चारापिके घेणे शक्य होणार असल्याने जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. परिणामी, यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नसून, उन्हाळी पिकांसाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

निरा उजव्या व डाव्या कालव्यात पाणी सोडले

निरा खोऱ्यातील धरण क्षेत्रात यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पुढील पावसाळा जुलैपर्यंत पावसाचे प्रमाण कमी झाले, तरीही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, असा विश्वास पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे. शेती व पिण्याच्या पाण्यासाठी निरा उजव्या व डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले असून, त्याचा लाभ शेतकरी वर्ग तसेच विविध पाणीपुरवठा संस्थांना होणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT