Organ Donation Pudhari
पुणे

Nine Year Old Organ Donation: नऊ वर्षांच्या चिमुरड्याच्या अवयवदानातून चार जणांना जीवनदान

अपघातात मेंदूमृत्यू; आई-वडिलांनी दुःख बाजूला ठेवून घेतला अवयवदानाचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सोलापूरमध्ये घरासमोर रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या नऊ वर्षांच्या मुलाच्या अवयवदानातून चार रुग्णांना अवयव मिळाले. उपचारादरम्यान मुलाचा मेंदू मृत घोषित करण्यात आला. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी दुःख बाजूला ठेवून अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या चार रुग्णांवर अवयव प्रत्यारोपण करण्यात आले.

अपघातानंतर मुलाला सोलापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असूनही प्रकृती सुधारली नाही. त्यानंतर डॉक्टरांनी मुलाला मेंदू मृत (ब्रेन डेड) घोषित केले. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी पालकांशी अवयवदानाबाबत चर्चा केली. मुलाच्या पालकांनी संमती दिल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली.

पुणे विभागातील शासकीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या (झेडटीसीसी) प्रतीक्षा यादीनुसार रुग्णांना अवयव देण्यात आले. मुलाचे हृदय चेन्नईतील एका बालरुग्णाला देण्यात आले. यकृत पुण्यातील एका रुग्णाला, तर दोन्ही मूत्रपिंडे पुण्यातील दोन रुग्णांना देण्यात आली.

या संपूर्ण प्रक्रियेत अतिदक्षता तज्ज्ञ डॉ. पल्लवी मेहता, डॉ. वीरेश नाष्टे, डॉ. संतोष गुजरे, डॉ. शरद जाधव आणि प्रत्यारोपण समन्वयक डॉ. संदीप पाटील यांच्यासह रुग्णालयातील पथकाने सहभाग घेतला, अशी माहिती समन्वय समितीकडून देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT