निमोणे: शिरूर तालुक्यातील निमोणे परिसरात बिबट्यांच्या झुंडी दिसून आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यांची झुंड कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर तो व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दै. ‘पुढारी’ने या घटनेची वस्तुनिष्ठ माहिती प्रसिद्ध केल्यानंतर वन विभागाने निमोणे-मोटेवाडी परिसरात एक पिंजरा बसविला आहे. परंतु, परिसरात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असताना फक्त एक पिंजरा पुरेसा ठरणार नाही, अशी नागरिकांची भावना असून, पिंजऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे. (Latest Pune News)
या भागात बिबट्यांची नेमकी संख्या किती आहे, हा कळीचा मुद्दा बनला आहे. घोड नदीच्या काठावर असे क्वचितच गाव उरले आहे, जिथे बिबट्यांचा वावर नाही. घोड आणि भीमा नदीच्या दोन्ही काठांवर बिबटे खुलेपणाने वावरताना दिसत असून, या परिसरातील पशुधन आणि पाळीव कुत्रे यांची बिबट्यांकडून वारंवार शिकार होत आहे.
शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात दोन नागरिकांचा बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले असून, त्या भागात छावणीसदृश वातावरण निर्माण झाले आहे. विश्वसनीय माहितीनुसार, शिरूर वन विभागाकडे एकूण 35 पिंजरे आहेत, त्यापैकी 30 पिंजरे पश्चिम भागात लावण्यात आले आहेत. तालुक्याची भौगोलिक हद्द सुमारे 100 किलोमीटर असून, काठापूरपासून तांदळीपर्यंत सर्वत्र बिबट्यांचा वावर दिसतो. ऊस हे प्रमुख पीक असल्याने दडण व खाद्य मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, त्यामुळे बिबट्यांची पैदास वाढली आहे.
शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी सांगितले की, संपूर्ण भारतात शिरूर-जुन्नर परिसरात सर्वाधिक बिबट्यांची संख्या आढळते. अधिक पिंजरे मिळविण्यासाठी शासनपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी लहान मुले व वयोवृद्ध यांची विशेष काळजी घ्यावी. रात्री शेताला पाणी देण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी एकटे जाऊ नये, प्रखर उजेडाचे टॉर्च वापरावेत, मोबाईलवर गाणी लावावीत, सायंकाळी साडेपाचनंतर ते सकाळी साडेआठ वाजेपर्यंत बिबट्यांचा वावर अधिक असल्याने या वेळेत खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. वन विभागाकडून बिबटे जेरबंद करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.