Accident Pudhari
पुणे

Nimone Accident Krishna Kale: निमोणेतील काळरात्र: आई-वडील गमावूनही आठवीतील कृष्णाचे आजीला धीर

अपघातात कुटुंबीयांचा मृत्यू; दुःखाच्या डोंगरातही कृष्णा काळेचे धैर्य गावकऱ्यांना अश्रू अनावर करणारे

पुढारी वृत्तसेवा

निमोणे: खूप दिवसांनी आई, वडील, मामा आणि बहीण या सर्वांसमवेत त्याने काही काळ हसत-खेळत व्यतीत केला... त्यानंतर काही वेळाने त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी विरहाचे दुःख झेलत आप्तजनांनी परतीचा प्रवास सुरू केला आणि क्षणातच होत्याचे नव्हते झाले... ही घटना आहे कृष्णा काळे याची... परंतु, आठवीतील कृष्णा यानंतर आजीसोबत जे काही वागला ते बघता त्याला अकाली प्रौढत्व आले, असेच म्हणावे लागेल.

सत्य हे कल्पनेपेक्षा खूप भयानक असते आणि त्याचाच प्रत्यय शिरूर तालुक्यातील निमोणे गावच्या काळे कुटुंबाला आला. शनिवारी (दि. 14) मध्यरात्र या कुटुंबासाठी काळरात्र ठरली. रस्ते अपघातात पवन राजहंस काळे, आराध्या काळे व बाळासाहेब नागवडे हे जागीच ठार झाले, तर वंदना पवन काळे ह्या गंभीर जखमी झाल्या. काळे यांचा मुलगा कृष्णाची ही कहाणी.

कृष्णा पवन काळे हा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात इयत्ता आठवीमध्ये शिकत आहे. या मुलाला भेटण्यासाठी हा संपूर्ण परिवार पन्हाळा या ठिकाणी गेला होता. कृष्णाच्या आवडी-निवडी आई-बापाशिवाय दुसऱ्या कोणाला माहीत असणार. शाळेच्या हॉस्टेलमधील चार भिंतीच्या आत तो मागील कित्येक महिने आप्तजनांपासून दूर होता. अनपेक्षितपणे सगळे त्याला भेटायला आले तो काही काळ त्याच्या आयुष्यातला सुवर्णकाळ होता. निर्धारित वेळेनंतर आई-बाप आणि मामाने त्याला हृदयाशी कवटाळले. लहानग्या बहिणीची पावले अडखळत होती; मात्र परतीच्या प्रवासात नियतीने त्यांच्यावर घाला घातला.

दरम्यान, कृष्णा ज्या शाळेत शिकत होता, त्या ठिकाणी मध्यरात्री संपर्क करून या घटनेची कल्पना त्याच्या शिक्षकांना देण्यात आली. रातोरात शिक्षकांनी कृष्णाला बरोबर घेऊन त्याचे मूळ गाव असणाऱ्या निमोणेकडे प्रस्थान केले. आपले आई-वडील, बहीण आणि मामा काही वेळापूर्वीच आपल्याला भेटून गेले तरीही आपल्याला का गावाकडे घेऊन चाललेत? हे त्या बाळाला शेवटपर्यंत कळूच दिले नाही. कृष्णाच्या दारासमोर गाडी येऊन थांबल्यानंतर आप्तजनांनी एकच आक्रोश केला. त्याला काय सांगावे, हे त्याच्या कुटुंबाला किंवा गावकऱ्यांना समजत नव्हते. त्याच वेळेला त्याचे वडील पवन, बहीण आराध्या व मामा बाळासाहेब नागवडे यांच्यावर न्हावरे ग््राामीण रुग्णालयात शवविच्छेदन सुरू होते.

तुम्ही का रडताय? नक्की काय झालं मला सांगा ना... हे कृष्णाचे बोल प्रत्येकाच्या काळजाचा ठाव घेत होते. त्याच्या चुलत्यांनी त्याला हृदयाशी घट्ट कवटाळले. सर्वांच्या संयमाचा बांध फुटला. जो तो टाहो करीत होता. अशाही परिस्थितीत आपल्या आजीचा विलाप तिला सहन होणार नाही, ती खूप हळवी आहे, या जाणिवेतून गर्दीतून वाट काढत कृष्णा धावत जाऊन आजीच्या कुशीत विसावला. पदराने तिचे डोळे पुसत... तू रडू नको मी आहे ना! मला सांग काय झालं? तुम्ही रडत बसला तर आपलं कसं होईल? हे त्याचे बोल अनेकांचे काळीज चिरून टाकणारे होते. नियतीने त्याच्यावर चहूबाजूने आघात केला. अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील कृष्णा ज्या धैर्यपूर्ण पद्धतीने इतरांचे सांत्वन करीत होता, हे पाहिल्यानंतर या बाळाला नियतीने अकाली प्रौढत्व बहाल केले, असेच म्हणावे वाटते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT