निमोणे : व्यसन आणि विवाहबाह्य संबंधांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाल्याच्या घटना माध्यमांतून ऐकायला, पहायला मिळतात. अशीच एक घटना शिरूर तालुक्यातील निमोणे गावात उघडकीस आली. प्रेमभंग व नैराश्यातून वीट भट्टीवर काम करणाऱ्या एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आणि त्याचे कुटूंब वाऱ्यावर आले.(Latest Pune News)
अनिल लक्ष्मण रोकडे (वय 35, मूळ रा. कात्राबाद मांडवगण, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर, सध्या रा. काळेवस्ती, निमोणे, ता. शिरूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गावात शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून एक कुटुंब कामाला होते. या कुटुंबातील महिला तिच्या पती व तीन मुलांसोबत संसार चालवत होती. याच घरात व्यसनाधीन व कुटुंबाकडून हाकलल्या गेलेला दूरचा नातेवाईक असलेला अनिल रोकडे आसऱ्याला आला. त्याला या कुटुंबाने जवळ केले; परंतु काही दिवसांतच अनिल आणि महिलेमध्ये जवळीक वाढली. त्यातून ते दोघे घर सोडून पळून गेले.
इकडे महिलेचा पती व तीन मुलांनी मोठा आघात सोसत पोलिसांत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी दोन महिन्यांच्या शोधमोहिमेनंतर अनिलसह महिलेला निमोणे येथील वीटभट्टीवरून ताब्यात घेतले. समुपदेशनानंतर ती महिला तिच्या पती व मुलांकडे परतण्यास तयार झाली. मात्र या निर्णयाने अनिलचा भमनिरास झाला.
प्रेमभंग व नैराश्यात गुरफटलेल्या अनिलने बुधवारी (दि. 1) रात्री वीटभट्टीवरील घरात ओढणीच्या सहाय्याने लोखंडी अँगलला गळफास घेत जीवनयात्रा संपविली.
अनिल हा विवाहित होता. त्याला पत्नी व तीन मुले होती. या घटनेमुळे अनिलची पत्नी व तीन मुले देखील उघड्यावर पडली आहेत. अनिलच्या आत्महत्येप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विनोद मोरे करत आहेत.