संतोष ननवरे
शेळगाव : इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी जिल्हा परिषद गटामध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाले, तर शेळगाव पंचायत समिती गणासाठी सर्वसाधारण व निमगाव केतकी गणासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण जाहीर झाले. निमगाव केतकी जिल्हा परिषद गटामध्ये पुन्हा महिला जिल्हा परिषद सदस्येला संधी मिळणार आहे. कृषिमंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भाजप नेते तथा माजी सभापती प्रवीण माने यांच्या प्रतिष्ठेची लढत या गट-गणामध्ये होणार आहे.(Latest Pune News)
जिल्हा परिषद सदस्यासाठी महिला आरक्षण जाहीर झाल्याने मागील काही महिन्यांपासून जिल्हा परिषद सदस्य होण्याचे अनेकांचे स्वप्न भंगले आहे. नाइलाजाने पुन्हा एकदा त्यांना पत्नीलाच निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
निमगाव केतकी-शेळगाव या गटावर मागील अनेक वर्षांपासून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे वर्चस्व राहिले आहे. मागील निवडणुकीमध्ये या गटात भारती मोहन दुधाळ विजयी झाल्या होत्या तसेच निमसागर गणातून सुवर्णा बाबूराव रणवरे व शेळगाव गणातून देवराज जाधव हे विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिन्ही उमेदवारांचा पराभव केला होता. मात्र, मागील काही वर्षांत विद्यमान आमदार तथा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली या गटामध्ये कोट्यवधीच्या निधीतून विविध विकासकामे पूर्ण झालेली आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये भरणे यांना या गटातून जवळपास 4 हजारांहून अधिकचे मताधिक्य मिळालेले आहे. हर्षवर्धन पाटील यांचे अनेक समर्थक भरणे यांच्याकडे दाखल झालेले आहेत. या गटामध्ये प्रामुख्याने माळी, धनगर, मराठा या समाजांचे प्राबल्य आहे. यामुळे या समाजांना उमेदवारी देताना सर्वच पक्षांच्या नेत्यांची मोठी दमछाक होणार आहे.
या गटात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शेळगाव येथील ‘छत्रपती’चे माजी संचालक ॲड. लक्ष्मणराव शिंगाडे, कर्मयोगी कारखान्याचे माजी संचालक राहुल जाधव, हनुमान सोसायटीचे संचालक बापूराव दुधाळ, कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूरचे सभापती तुषार जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी संदीप भोंग, निमगाव केतकीचे सरपंच प्रवीण डोंगरे, छत्रपतीचे माजी संचालक अभिजित रणवरे, वैभव शिंगाडे, ग्रामपंचायत सदस्य प्रताप चवरे, नितीन पवार यांना पक्षश्रेष्ठींनी संधी दिली तर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची इच्छा व्यक्त केली आहे.
भाजपकडून इंदापूर भाजपचे अध्यक्ष राजकुमार जठार यांनी देखील निवडणूक लढणार असल्याचे सांगितले आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या गटाकडून विद्यमान सदस्या भारती मोहन दुधाळ यांना पक्षश्रेष्ठींनी संधी दिली तर पुन्हा जिल्हा परिषद निवडणूक लढविणार असल्याची इच्छा व्यक्त केली आहे. निमगाव गणातून पंचायत समितीसाठी केतकेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष गोरख आदलिंग यांनी देखील निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
प्रवीण माने यांच्या पत्नी रिंगणात?
निमगाव गटामध्ये शेळगाव नव्याने दाखल झालेल्या रुई गावचे पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार त्यांची पत्नी देखील निमगाव गटात जिल्हा परिषदेच्या संभाव्य उमेदवार म्हणून असण्याची शक्यता नाकरता येत नाही. यामुळे निमगाव केतकी गटात तिरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.