इंदापूर: मकरसंक्रांतीचा सण येत्या बुधवारी (दि. 14) आहे. या सणानिमित्त आणि पूजेसाठी नागवेलीच्या पानांचा वापर केला जातो. त्यामुळे या पानांना आता मोठी मागणी वाढल्याचे इंदापुरातील निमगाव केतकी पानबाजारात दिसून आले. या बाजारात रविवारी (दि. 11) पानांची आवक कमी झाली होती, त्यामुळे दरात वाढ झाल्याचे चित्र दिसून आले.
निमगाव केतकी येथे दर बुधवारी आणि रविवारी पानांचा बाजार भरतो. या ठिकाणी महाराष्ट्रातून अनेक व्यापारी पान खरेदीसाठी येतात. या पानबाजारात मोठी आर्थिक उलाढाल होत असते. याबाबत पान व्यापारी श्री केतकेश्वर सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष गोरख आदलिंग म्हणाले, सध्या शेज (कळी) या पानाच्या प्रकारास तब्बल 8500 हजार रुपये डागाला दर मिळत आहे. लहान आकाराच्या सरपट प्रकाराच्या पानाला अठराशे ते 2000 पर्यंत दर आहे. गाळगबाळ याचा दर दीड हजार ते तीन हजार रुपयांपर्यंत आहे.
सध्या वाढत्या थंडीमुळे पानांची आवक कमी होत आहे. येथे रविवारी मागणीपेक्षा पानांची आवक कमी झाली होती. येथे जवळपास केवळ दीडशे ते 200 डाग आले होते. सहा हजार पानांचा मिळून एक डाग किंवा पुडगी बनवली जाते. या पानांना चांगला दर मिळाला. 8पान 4 वर
या बाजारात इंदापूर तालुक्यातील माळवाडी, वरकुटे खुर्द, गोतंडी, व्याहाळी, निमगाव केतकी व परिसर, तसेच थेट उमरगा परिसरातूनही पानांची आवक झाली होती. सध्या पानाला चांगले दर मिळत असल्याने पान उत्पादक मळेधारक यांच्यामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
थंडी, रोगांचा पानावर परिणाम--
मागील दोन महिन्यांपासून कडाक्याची थंडी असल्याने पानमळ्यातील पानांच्या वेलाला पटणारे फुटवे जळून गेले. पानांच्या फुटव्यांवर चिकटा, मवा, मर, करपा या विविध रोगांच्या प्रादुर्भाव वाढला. यामुळे पानाचे उत्पादन घटले असून हे चिंतेचे बाब आहे. तसेच अलीकडे पानांच्या दरात सातत्याने घट होत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पानाचे मळे काढून टाकले आहेत.