पुणे: गुंड नीलेश घायवळचा साथीदार अमोल दत्तात्रय लाखे (रा. लाखनगाव, ता. वाशी, जि. धाराशिव) याच्यावर वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शेतीकामासाठी कर्ज मिळवून देतो, नीलेश घायवळकडून नोकरी देतो, असे सांगून त्याने मित्राची कागदपत्रे घेऊन त्यावरून सीमकार्ड मिळवून आर्थिक व्यवहार केल्याचे पुढे आले आहे. (Latest Pune News)
याप्रकरणी सुरेश जालिंदर ढेंगळे (वय 32, रा. पारा, ता. वाशी, जि. धाराशिव) यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 1 एप्रिल 2019 ते 29 ऑक्टोबर 2025 दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश घायवळ, अमोल लाखे व इतरांनी व्यावसायिक महिलेकडून 44 लाखाची खंडणी उकळ्याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याचा तपास करीत असताना अमोल लाखे हा वापरत असलेला मोबाईल क्रमांक सुरेश ढेंगळे याच्या नावावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी त्याला बोलावून घेतले होते. त्याने पोलिसांना सांगितले की, 2013 -14 मध्ये महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्याची अमोल लाखे याच्याशी ओळख झाली. अमोल लाखे याचे गाव व त्याचे आजोळ एकच लाखणगाव असल्याने त्यांच्यात मैत्री झाली होती. एप्रिल 2019 मध्ये लाखणगावमध्ये अमोल लाखे हा सुरेश याला भेटला. तेव्हा सुरेश याने त्याला शेतीसाठी तसेच इतर व्यवसायासाठी कर्ज काढायचे असल्याचे सांगितले होते.
अमोल याने ’मी तुला शेतीसाठी व इतर व्यवसायासाठी कर्ज काढून देतो. तू मला भेटायला पुण्याला ये, पुण्याला माझ्या खूप ओळखी आहेत. तसेच माझी नीलेश घायवळ आणि त्याच्या बऱ्याच मित्रांची ओळख आहे. जमले तर तुला नोकरीसुद्धा लावून देतो, तू पुण्याला येताना सोबत तुझी कागदपत्रे घेऊन ये,’ असे सांगितले. त्यानुसार सुरेश हे कर्ज मिळविण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे घेऊन पुण्यात आले. अमोल लाखे याने वारजे पुलाखाली भेटायला बोलावले. तेथे त्याने सुरेश यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, शेतीच्या उत्पन्नाच्या दाखल्याची कागदपत्रे तसेच पासपोर्ट साईजचे फोटो आणि इतर कागदपत्रे घेतली होती. त्यानंतर तुझे कर्ज मंजूर झाल्यावर तुला फोन करून सांगतो आणि तुझ्या नोकरीबद्दल मी माझा मित्र नीलेश घायवळ याला बोललो आहे.' ते देखील तुला सांगतो, असे सांगून तो निघून गेला.
त्यानंतर सुरेश ढेंगळे यांना कर्जाची गरज नसल्याने तसेच लॉकडाऊन पडल्याने त्यांनी अमोल लाखे याला कर्जासाठी दिलेल्या कागदपत्राची त्यांनी चौकशी केली नाही. दरम्यान, अमोल लाखे याने फिर्यादींचा विश्वास संपादन करून त्यांनी कर्ज घेण्यासाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करून त्यांच्या नावावर रिलायन्स जिओ कंपनीचे सीमकार्ड स्वत:च्या वापरासाठी घेऊन सुरेश ढेंगळे यांची फसवणूक केली. पोलिस उपनिरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.