Tuberculosis Pudhari
पुणे

Pune Nikshay Mitra Yojana: निक्षय मित्र योजनेत पुणे महापालिकेची चमक; देशात द्वितीय क्रमांक

तीन वर्षांत 19,900 फूड बास्केटचे वितरण; क्षयरोगमुक्त भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: क्षयरोगमुक्त भारताच्या दिशेने पाऊल टाकण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने निक्षय मित्र योजना सुरू केली. योजनेच्या अंमलबजावणीत दादर विभागाने प्रथम, तर पुणे महापालिका द्वितीय क्रमांक पटकावला आहे. क्षयरोगग््रास्तांना पोषणात्मक आधार देण्यासाठी सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत दादरमध्ये गेल्या तीन वर्षांत 21 हजार 504, तर पुणे शहरात 19 हजार 900 फूड बास्केटचे वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे हजारो रुग्णांना पोषण व उपचारांमध्ये मोठा आधार मिळाला आहे.

निक्षय मित्र योजनेचा उद्देश क्षयरोग रुग्णांना केवळ औषधोपचारापुरते मर्यादित न ठेवता, त्यांच्या पोषण गरजांकडेही लक्ष देणे हा आहे. राज्यात विविध ठिकाणी शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर रुग्णांपर्यंत पोषण आहार पोहोचवला आहे. यामध्ये धान्य, कडधान्ये, प्रथिनयुक्त अन्नपदार्थ, तेल आणि इतर जीवनसत्त्वयुक्त घटकांचा समावेश आहे.

पुणे शहरात महापालिकेच्या पुढाकाराने आणि दानशूर संस्था, व्यक्तींच्या सहभागातून फूड बास्केटचे प्रभावी वितरण करण्यात आले आहे. नियमित औषधोपचारा सोबत योग्य आहार मिळाल्याने रुग्णांच्या तब्येतीत सुधारणा होण्यास मदत झाली असून, उपचार पूर्ण करण्याचे प्रमाणही वाढले आहे. निक्षय मित्र योजनेमुळे समाजातील विविध घटक क्षयरोग निर्मूलनाच्या लढ्यात सहभागी होत आहेत.

पुणे शहरात महापालिकेने निक्षय मित्र योजनेसाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत 19 हजार 900 फूड बास्केटचे वितरण करण्यात यश आले. योजना अधिकाधिक रुग्णांपर्यंत पोहचविण्यासाठी आणि जास्तीत जास्त निक्षय मित्रांची नोंदणी करून घेण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे.
डॉ. प्रशांत बोठे, क्षयरोग अधिकारी, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT