पुणे

हापूस वाढवणार नववर्षाची गोडी : गेल्या पाच वर्षांतील उच्चांकी आवक

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पोषक वातावरणामुळे उत्पादनात झालेली वाढ व फळधारणेनंतर हवामानाने दिलेली साथ यामुळे गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात मुबलक प्रमाणात हापूस दाखल होत आहे. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात मागील आठवड्यापासून दररोज दहा हजार पेट्यांची आवक होत आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत ही आवक मोठी असल्याने दरही डझनामागे 500 रुपयांनी कमी झाले आहेत. बाजारात 400 ते 1000 रुपये प्रतिडझन या दराने हापूसची विक्री होत आहे. फळांचा राजा हापूस आंब्याला मागील काही वर्षांमध्ये फळधारणा कमी होत होती. त्यामुळे, सर्वसामान्यांना हापूसची चव चाखण्यासाठी अक्षय्यतृतीयेपर्यंत वाट पाहावी लागत होती. या काळातही हापूसचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात येत नव्हते. यंदा परिस्थिती उलट आहे. अक्षय्यतृतीया काळात परवडणारा हापूस यंदा आवाक्यात आला आहे.

घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे

4 ते 8 डझन

  • कच्चा 1 हजार 500 ते 2 हजार 500
  • तयार 2 हजार ते 3 हजार रुपये

5 ते 10 डझन

  • कच्चा 2 हजार ते 3 हजार 500
  • तयार 2 हजार 500 ते 4 हजार

गुढीपाडव्यानिमित्त सर्वसामान्य ग्राहक आणि आंबा विक्रेत्यांकडून हापूसला मागणी वाढली आहे. मागील वर्षी घाऊक बाजारात डझनाचा दर 700 ते 1400 रुपये होता. यंदा डझनाचा दर 500 ते 1000 रुपये आहे. येत्या काळात आवक वाढून दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.

युवराज काची, हापूसचे व्यापारी, मार्केट यार्ड.

यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दर्जेदार व स्वस्त आंबा बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. दरही आवाक्यात असल्याने खरेदीसाठी घाऊकसह किरकोळ बाजारातही गर्दी होत आहे. यंदा आंबा भरपूर प्रमाणात बाजारात दाखल होण्याची शक्यता असून, दरही सर्वांच्या आवाक्यात राहतील.

अरविंद मोरे, हापूसचे व्यापारी, मार्केट यार्ड.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT