पुणे: भारताच्या क्षयरोगनिर्मूलन मोहिमेला मोठा दिलासा देणारे निष्कर्ष समोर आले असून. बिटीश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार व्हीपीएम 1002 आणि इम्युव्हॅक या दोन नव्या लसींनी फुप्फुसां शिवाय इतर अवयवांमधील (एक्स्ट्रापल्मोनरी टीबी) क्षयरोग रोखण्यात आशादायक परिणाम दर्शविले आहेत. मुलांमध्ये या लसींचा संरक्षणात्मक परिणाम अधिक प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या व्हीपीएम 1002 या सुधारित बीसीजी लसीने सर्व वयोगटांमध्ये एक्स्ट्रापल्मोनरी टीबीविरुद्ध 50.4% परिणामकारकता दर्शविली. तसेच, 36 ते 60 वर्षे वयोगटात 79.5% इतकी परिणाम कारकता नोंदवली गेली. भारतात जगातील सुमारे 27 टक्के क्षयरोग रुग्ण आढळतात. या पार्श्वभूमीवर हे निष्कर्ष महत्त्वाचे मानले जात आहेत.
‘हा’ क्षयरोग देशातील 22 टक्के रुग्णांना
फुप्फुसांव्यतिरिक्त लिम्फ नोड्स, पोट, मणका, प्ल्युरा अशा अवयवांवर परिणाम करणारा क्षयरोग देशातील सुमारे 22 टक्के रुग्णांमध्ये आढळतो. या प्रकाराचे निदान करणे अवघड ठरते. प्रगत तपासण्यांनंतरही अनेकदा उशीर होतो, त्यामुळे गुंतागुंत वाढते.
दरम्यान, कॅडिला फार्मास्युटिकलनिर्मित इम्युव्हॅक लसीचाही अभ्यास करण्यात आला. दोन्ही लसी सुरक्षित असल्याचे आढळले. हा अभ्यास भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या संशोधकांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.
रुग्णांचा असा केला अभ्यास
सहभागी : 12,717 (6 वर्षांवरील टीबी रुग्णांचे निकट संपर्क)
ठिकाणे : सहा राज्यांतील 18 केंद्र
कालावधी : जुलै 2019 ते डिसेंबर 2020 (38 महिने फॉलोअप)
गट : व्हीपीएम1002, इम्युव्हॅक, प्लेसिबो (प्रत्येकी 4,239)
दुसरा डोस : एक महिन्यानंतर 11,829 जणांना
पूर्ण फॉलोअप : 96.7 टक्के सहभागी