पुणे

स्वायत्त अभियांत्रिकीमध्ये यंदापासूनच नवीन धोरण

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी यंदापासून करण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा 25 टक्क्यांपर्यंत आवडीचे बहुशाखीय शिक्षण घेण्यासोबतच मल्टिपल एन्ट्री आणि एक्झिटचा फायदा घेता येणार आहे. या निर्णयानुसार 40 टक्के अभ्यासक्रम हा ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करता येणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये धोरणाची अंमलबजावणी होणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला. या निर्णयानुसार अभ्यासक्रम चार वर्षांचाच राहणार असून, एका वर्षांत दोन सेमिस्टर राहणार आहेत. विद्यार्थ्यांना एका सेमिस्टरमध्ये किमान 20, तर कमाल 22 क्रेडिट्स मिळवता येणार आहेत.

त्याचप्रमाणे आपल्या पसंतीच्या विषयाचे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे पहिल्या वर्षाचे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे प्रमाणपत्र (40 ते 44 क्रेडिटस्), तर दोन वर्षांचे शिक्षण (80 ते 88 क्रेडिटस्) घेतल्यानंतर पदविका मिळणार आहे. त्याचप्रमाणे पहिल्या तीन वर्षांच्या शिक्षणानंतर (120 ते 132 क्रेडिट्स) बी.व्होक किंवा बीएस्सी इन इंजिनिअरिंगची पदवी मिळणार आहे. या निर्णयानुसार पहिल्यांदा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्रे, मानव्यशास्त्रांचे शिक्षण घेता येणार आहे.

180 क्रेडिट्स मिळवल्यानंतर अभियांत्रिकीची पदवी

विद्यार्थ्यांनी किमान 160, तर कमाल 180 क्रेडिट्स मिळवल्यानंतर अभियांत्रिकीची पदवी मिळणार आहे. निर्णयात सांगितल्याप्रमाणे 160 क्रेडिट्स पूर्ण केल्यानंतर बीई (मल्टिडिसिप्लिनरी मायनर) अशी पदवी मिळणार आहे. त्याचप्रमाणे 180-194 क्रेडिट्स पूर्ण केल्यानंतर बीई (हॉनर्स अँड मल्टिडिसिप्लिनरी मायनर), बीई (नर्स विथ रिसर्च अँड मल्टिडिसिप्लिनरी मायनर) आणि बीई (मेजर इंजिनिअरिंग डिसिप्लिन विथ डबल मायनर्स) अशा पदव्या मिळणार आहेत.

प्रमुख वैशिष्ट्ये…

  • विद्यार्थ्यांना एका शाखेतून इतर शाखेत प्रवेश घेण्याची मुभा.
  • सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांना आवडीच्या विषयांचे शिक्षण घेता येईल.
  • प्रत्येक वर्षानंतर मल्टिपल एन्ट्री आणि एक्झिटची संधी
  • आंतरविद्याशाखीय शिक्षण घेण्यासाठी दुसर्‍या कॉलेज किंवा विद्यापीठात शिक्षणाची संधी.
  • ऑन जॉब ट्रेनिंग, इंटर्नशिप
  • ऑनलाइन, ऑफलाइन, ओपन अँड डिस्टंन्स लर्निंग मोड, हायबि—डमध्ये शिक्षणाची संधी

हेही वाचा

SCROLL FOR NEXT