सातारा जिल्ह्यात शरद पवार- अजित पवार गटांतील संघर्ष उफाळणार

सातारा जिल्ह्यात शरद पवार- अजित पवार गटांतील संघर्ष उफाळणार

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये बुधवारी मुंबईत कोणता झेंडा घेऊ हाती, अशी परिस्थिती झाली. शरद पवारांच्या सभेला जायचे की अजित पवारांच्या सभेला जायचे, अशी संभ्रमावस्था पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये दिसली. त्यामुळे सातारा जिल्ह्यातही भविष्यकाळात शरद पवार व अजित पवार गटांमध्ये संघर्ष उफाळणार आहे. विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे ना. निंबाळकर, आ. दीपक चव्हाण हे अजितदादांच्या व्यासपीठावर तर खा. श्रीनिवास पाटील, आ. शशिकांत शिंदे व आ. बाळासाहेब पाटील हे खा. शरद पवार यांच्या व्यासपीठावर दिसले. आ. मकरंद पाटील यांनी दोन्हीकडे जायचे टाळले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर सातारा जिल्ह्यातही उभी फूट पडली आहे. खा. शरद पवार यांनी सातार्‍याच्या दौर्‍यात डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा संपूर्ण प्रयत्न यशस्वी झाल्याचे दिसले नाही. अनेक तालुक्यांमधून अजितदादांच्या सभेलाही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. त्यामुळे संपूर्ण सातारा जिल्हा हा शरद पवारांचा बालेकिल्ला आहे, या विधानाला तडा गेला.

खा. शरद पवार यांच्या व्यासपीठावर खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे तर समोर सारंग पाटील, सुनील माने,राजकुमार पाटील यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी दिसले. त्यात सातार्‍यातून शशिकांत वाईकर, अतुल शिंदे, दीपक पवार, सचिन जाधव, सचिन चव्हाण, जावलीतून समिंद्रा जाधव, कोरेगावातून राजाभाऊ जगदाळे, संजना जगदाळे, श्रीमंत झांजुर्णे, सनी शिर्के, कराडमधून मानसिंग जगदाळे, देवराज पाटील, पाटणमधून सत्यजित पाटणकर, राजाभाऊ शेलार, राजेश पवार, माणमधून प्रभाकर देशमुख, अभय जगताप, बाबासाहेब सावंत, वाईतून प्रमोद शिंदे, महादेव मस्कर, प्रताप पवार, खंडाळ्यातून दत्तानाना ढमाळ, डॉ. नितीन सावंत, अजय भोसले, महाबळेश्वरमधून रोहित ढेबे उपस्थित होते. तर अजितदादांच्या सभेला व्यासपीठावर आ. रामराजे ना. निंबाळकर, आ. दीपक चव्हाण तर समोर किरण साबळे-पाटील, सचिन बेलागडे, राजेंद्र नेवसे, अमित कदम, नंदकुमार मोरे, रमेश धायगुडे-पाटील, बंडू ढमाळ, विक्रमबाबा पाटणकर, अरुण माने, नागेश जाधव, मंगेश धुमाळ, नीलेश कुलकर्णी, संभाजी घाडगे, रमेश शिंदे, बाळासाहेब शेळके यांच्यासह अनेक तालुक्यांमधील पदाधिकारी व कार्यकर्ते होते.

सभेनंतरही या कार्यकर्त्यांमध्ये कोणता झेंडा घ्यायचा, यावरून संभ्रम होता. शरद पवार व अजित पवार यांनी मतभेद संपवून तातडीने एकत्र यावे, अशा प्रतिक्रिया अनेक कार्यकर्त्यांनी जाहीरपणे व्यक्त केल्या. मात्र, दोन्ही सभांनंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील अशी शक्यता दुरापास्त झाल्याने भविष्यकाळात शरद पवार-अजित पवार गटांत सातारा जिल्ह्यात संघर्ष उफाळणार, असेच चित्र निर्माण झाले आहे.

मकरंद पाटील कुठेच फिरकले नाहीत

आ. मकरंद पाटील दोनच दिवसांपूर्वी शरद पवारांच्या दौर्‍यात पूर्णवेळ होते. मात्र, मुंबई येथील सभेला कोणत्याच व्यासपीठावर ते दिसले नाहीत. मकरंद पाटील यांचे पवार कुटुंबीयांशी कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे त्यांची कुचंबणा वाढली असल्याची चर्चा असून, वैद्यकीय कारणास्तव आ. मकरंद पाटील दोन्ही सभांकडे फिरकले नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यांचे कार्यकर्ते खा. शरद पवार यांच्या सभेला उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news