Maharashtra Political Crisis : बापाचा नाद करायचा नाय; खासदार सुप्रिया सुळे यांचा इशारा | पुढारी

Maharashtra Political Crisis : बापाचा नाद करायचा नाय; खासदार सुप्रिया सुळे यांचा इशारा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  शरद पवार हे आमच्या सर्वांचे बाप आहेत. आम्ही काहीही ऐकून घेऊ पण बापाबद्दल बोललेले ऐकून घेणार नाही. आमच्या बापाचा कोणी नाद करायचा नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.
आम्हाला भाजपवाले सर्वात भ्रष्ट पक्ष म्हणायचे. पण आज आमच्या या पक्षातील लोकच त्यांनी सोबत घेतले आहेत. बर्‍याच लोकांना इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडीची भीती दाखविली. त्याला हे लोक बळी पडले. पक्षातील मुले बापाला सोडून गेली, असे सांगून तुमच्यापेक्षा आम्ही मुली बर्‍या ज्या अडचणीत आई बापाला सोडत तरी नाहीत, असा हल्ला सुळे यांनी चढविला.

शरद पवारांचे वय झाले असले तरी ते सिंह आहेत. 2019 ला सर्वेक्षणात राष्ट्रवादी काँग्रेसला 11 जागा दिल्या होत्या. पण शरद पवार नावाचा योद्धा लढला आणि 54 जागा आल्या. तुम्हालाही महाराष्ट्रातील जनता थारा देणार नाही, असा इशारा त्यांनी फुटीर गटाला दिला. तसेच मी आता पदर खोचून उभी राहीन. हा आमचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात तुम्हाला काहीही खाऊ देणार नाही. रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला.

 

Back to top button