Mutha Canal Land Development Pudhari
पुणे

New Mutha Canal Land: नव्या मुठा कालव्याच्या जागी मेट्रो, सहापदरी रस्ता अन् हरित पट्टा; पुण्याचा चेहरामोहरा बदलणार

जलसंपदा विभागाचा प्रस्ताव नियोजन विभागाकडे; उद्याने, जॉगिंग ट्रॅकसह सार्वजनिक सुविधांचा विचार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या नवीन उजवा मुठा कालव्याच्या जागेवर मेट्रो, वाहनांसाठी रस्ते, नागरिकांसाठी उद्याने, जॉगिंग पार्क होणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेला प्रस्ताव जलसंपदा विभागाने राज्याच्या नियोजन विभागाकडे पाठवला असून, या प्रस्तावावर लवकरच तोडगा निघणार असल्याचे सूतोवाच जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी केले आहे.

खडकवासला प्रकल्पातून सुरू होणारा नवीन उजवा मुठा कालवा पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातून जात आहे. खडकवासला ते इंदापूर असा २०२ किमी लांबीचा हा कालवा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या कालव्यातून पाण्याची गळती होत आहे. ही बाब लक्षात घेऊन पाणीगळती रोखण्यासाठी खडकवासला प्रकल्पापासून ते फुरसुंगीपर्यंत ३४ किलोमीटर भूमिगत कालव्याचे काम सुरू झाले आहे.

आत्तापर्यंत या भूमिगत कालव्याचे ५ किमीहून अधिक काम झाले आहे. दरम्यान, या भूमिगत कालव्यातून पाणी सुरू झाल्यानंतर शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या नवीन उजवा मुठा कालव्यातून वाहणारे पाणी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालव्याची जागा तसेच कालव्याच्या आसपास असणारी खडकवासला पाटबंधारे विभागांतर्गत येणारी जागा मोकळी होणार आहे. ही जागा ३४ किमी असून, त्यामधील बहुतांश जागा अतिशय महत्त्वाची आहे.

कालव्याच्या दोन्ही बाजूस अतिक्रमणे

कालव्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झालेली आहेत. उपलब्ध जुन्या सर्वेक्षणानुसार कालव्याच्या ३४ किमीच्या परिसरातील जलसंपदा विभागाच्या जागेचा मोठा भाग विविध वापरात असून, अतिक्रमणांचाही प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे बोगदा पूर्ण झाल्यानंतर मोकळी होणारी जागा नेमकी कोणत्या विभागाकडे राहणार, तिचे सीमांकन कसे होणार आणि तिचा वापर कोणत्या पद्धतीने केला जाणार, याला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला पर्यायी मार्ग देतानाच शहराच्या मध्यवर्ती भागात मोठा हरित आणि सार्वजनिक मोकळा पट्टा निर्माण करण्याची संधी या प्रकल्पामुळे उपलब्ध होऊ शकते. मात्र, अंतिम आराखडा, विभागनिहाय जमीनवाटप आणि विविध सुविधांना मंजुरी मिळाल्यानंतरच या प्रस्तावाला प्रत्यक्ष स्वरूप येणार आहे.

सहापदरी रस्ता; भविष्यात मेट्रो

भूमिगत बोगद्यातून पाणी वाहू लागल्यानंतर शहरातून जाणार्‍या या कालव्याची जागा टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार आहे. या जागेवर सहापदरी रस्ता बनवण्याचा विचार जलसंपदा विभागाच्या पातळीवर करण्यात आला आहे. तसेच शहराची भविष्यातील वाहतुकीची गरज लक्षात घेऊन या मार्गावर मेट्रो मार्गिका उभारण्याचाही पर्याय विचाराधीन आहे. या मार्गामुळे सिंहगड रस्ता तसेच सोलापूर रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यास मदत होणार आहे.

नागरिकांसाठी हरित पट्टा

कालव्याच्या मोकळ्या होणार्‍या जागेचा काही भाग नागरिकांसाठी राखून ठेवण्याचा विचार आहे. उद्याने, जॉगिंग ट्रॅक, व्यायामाची ठिकाणे, ज्येष्ठांसाठी विरंगुळ्याची ठिकाणे, वाचनासाठी जागा आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी खुल्या जागा विकसित करता येतील, असा पर्याय चर्चेत आहे. मात्र, या सर्व सुविधांसाठी अंतिम आराखडा आणि त्याची अंमलबजावणी अद्याप शासनाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT