पुणे

देशी गायींसाठी नवीन प्रजनन नियंत्रण कायदा : दुग्धव्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यात देशी गायींसह जातिवंत पशुधनाची पैदास करण्यासाठी नवीन प्रजनन नियंत्रण कायदा करण्यात येत आहे. त्याला विधी व न्याय विभागाने मंजुरी दिली असून, या कायद्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येईल, अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. गोरक्षणाला राज्य सरकारचे पाठबळ असून, गोसेवा आयोगाच्या सदस्यांना सर्वतोपरी मदत उपलब्ध करून दिली जाईल, असेही विखे पाटील म्हणाले.

औंध येथील पशुसंवर्धन इमारतीत महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या मुख्यालयाचे उद्घाटन विखे पाटील यांच्या हस्ते शनिवारी (दि. 2) झाले, त्या वेळी ते बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, सदस्य सुनील सूर्यवंशी, संजय भोसले, डॉ. नितीन मार्कंडेय, उध्दव नेरकर, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर, सहआयुक्त शीतलकुमार मुकणे आदी उपस्थित होते.
गोसेवा आयोगाची मूळ संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची असून, त्यांची प्रेरणा घेऊन राज्यात महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. या आयोगाची स्थापना व्हायला अनेक वर्षे लागली.

या आयोगाला आणखी निधी उपलब्ध करून दिला जाईल तसेच आयोगाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. विदर्भातील 11 जिल्ह्यांत दरदिवशी केवळ 10 लाख लिटर दूध उत्पादन होते. त्यामुळे या 11 जिल्ह्यांत दुग्धव्यवसायाच्या प्रचार व प्रसारासाठी 400 कोटी रुपयांचा कार्यक्रम हाती घेतल्याचे विखे यांनी सांगितले. 'राज्यात गोहत्या प्रतिबंधक कायदा लागू असून, गोसेवा आयोगाच्या माध्यमातून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल. शेतकर्‍यांनी आयोगाकडे गायी विकाव्यात तसेच गोरक्षणाच्या सेवेत जीव गमावलेल्या गोरक्षकांच्या कुटुंबांना एक लाख रुपये दिले जातील,' अशी घोषणा मुंदडा यांनी या वेळी केली.

…तर तुरुंगवासाचीही तरतूद
लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशी गायींच्या रक्षणासाठी नवीन प्रजनन कायद्याचा प्रस्ताव ठेवण्यात येईल. त्यामध्ये गायींच्या प्रजननात निकृष्ट दर्जाचे वीर्य वापरल्यास गुन्हा दाखल करून तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे. हा कायदा अमलात आल्यानंतर देशी गायींच्या संवर्धनास मदत मिळण्याचा विश्वास विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

गायीच्या उत्पादनांना प्रतिष्ठा मिळेल
गोसेवा आयोगाच्या माध्यमातून देशी गायींचे संगोपन, संरक्षण व संवर्धन करणे, गोरक्षकांना मदत करणे, गायीच्या दूध, शेण आणि मूत्रापासून तयार होणार्‍या उत्पादनांना समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम आयोगाकडून केले जाणार असून, त्याला सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT