बारामतीनजीक चारचाकीने धडक दिल्याने दोन शाळकरी मुलांचा मृत्यू | पुढारी

बारामतीनजीक चारचाकीने धडक दिल्याने दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

बारामती : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील जळगाव कडेपठार येथे भरधाव वेगातील चारचाकीने दहावीत शिकत असलेल्या तीन शाळकरी मुलांना सोमवारी (दि. 4) सकाळी सव्वानऊच्या सुमारास धडक दिली. या अपघातात ओंकार संतोष खांडेकर व रुपेश अमोल खांडेकर ही दोन शाळकरी मुले मृत्यूमुखी पडली. या अपघातात संस्कार संतोष खांडेकर हा देखील गंभीर जखमी झाला आहे. संस्कार हा पाचवीमध्ये शिकत आहे.

आज सकाळी नेहमीप्रमाणे घरुन शाळेमध्ये जाण्यासाठी ही तिन्ही शाळकरी मुले निघाली होती. जळगाव कडेपठार गावामध्ये पुणे बारामती रस्त्यावर मोरगावकडून बारामतीकडे निघालेल्या चार चाकीने (एमएच 24- सी- 8041) शाळेकडे निघालेल्या तिन्ही शाळकरी मुलांना जोरदार धडक दिली. या नंतर मोर्चाच्या पोलिस बंदोबस्तावर असलेल्या प्रवीण वायसे, राहुल पांढरे, विजय वाघमोडे व अमोल राऊत या पोलिस कर्मचा-यांनी त्यांच्याच खासगी गाडीतून बारामतीतील गावडे हॉस्पिटलमध्ये तिन्ही मुलांना नेले, मात्र त्या पैकी ओंकार खांडेकर व रुपेश खांडेकर यांचा मृत्यू झाला होता. संस्कार यास गिरीराज रुग्णालयाच उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

या तिन्ही मुलांना या गाडीने पाठीमागून येऊन धडक दिली व त्या नंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका वाहनाला ही गाडी जाऊन धडकली. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Afghanistan Earthquake | अफगाणिस्तानमधील फैजाबादमध्ये दोनवेळा भूकंपाचे धक्के

आईची मुलाविरुद्ध साक्ष; खून प्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा, नेमकं प्रकरण काय?

Back to top button