पुणे

तरुणाईने शोधलेयत करिअरचे नवे पर्याय

backup backup

पुणे : पुढारी वृत्तसेवा

कोणाचे कंपन्यांच्या जाहिरातीसाठी लिखाण सुरू आहे तर कोणी ऑडिओ बुकसाठी आपला आवाज देत आहे. कारण सध्या तरुणाई ब्लॉगर्स आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम करताना दिसत आहे. 25 ते 35 वयोगटातील तरुणाई यासाठी काम करीत असून, त्यांना या कामासाठी चांगले अर्थाजनही होत आहे. हे दोन्ही क्षेत्र तरुणाईसाठी करिअरचा नवा पर्याय बनले आहेत.

कोरोना काळात अडचणींना बाजूला सारत काहींनी आपले करिअरचे क्षेत्र बदलले. काहींनी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून ऑडिओ बुक्स ते माहितीपटांना आपला आवाज द्यायला सुरुवात तर काहींनी लिखाणाचे प्रशिक्षण घेत विविध संकेतस्थळांसह सोशल मीडिया व्यासपीठांवर कर्मशिअल ब्लॉग्स लिहायला सुरुवात केली आहे. दोन्ही क्षेत्रातील तरुणाईला महिन्याभराचा 20 ते 25 हजार रुपये आर्थिक मोबदला मिळत आहे. व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट प्रियांका शेजाळे म्हणाल्या, 'सध्या मी काही माहितीपटांसह ऑडिओ बुक्ससाठी काम करत आहे. गेल्या सात वर्षांपासून मी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम करत आहे. सध्याला अनेकजण प्रामुख्याने वेगवेगळे व्हिडिओ, ऑडिओ बुक्स, जाहिराती, माहितीपट-लघुपटांची काम करत आहेत. आत्ताच्या घडीला प्रादेशिक भाषांमधील व्हिडिओसाठीही आर्टिस्ट आपला आवाज देतात.'

सुरुवातीला हौस म्हणून सुरू केलेले लिखाण ब्लॉगच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू लागले. त्यामुळे ब्लॉग तयार करण्याचे दोन वर्षांपूर्वी मनावर घेतले. ब्लॉगिंग आपल्या कलेला शिस्त लावते. शिवाय वाचकवर्ग ब्लॉगिग संकेतस्थळावर असल्यामुळे आपल्या कलेवर विश्वास ठेवून ते लिखाण वाचतात. गेल्या काही वर्षांत ब्लॉगिंगमधून पैसा कमावण्याचे प्रमाण वाढले आहे. जेव्हापासून गुगलने प्रादेशिक भाषा असलेल्या ब्लॉग्जवरसुद्धा जाहिराती टाकण्याची परवानगी दिली आहे. म्हणूनच आपल्या भाषेत मजकूर तयार करून हौस तर पूर्ण होतेच तसेच थोडेफार पैसेही मिळतात. पुस्तक, चित्रपट, प्रॉडक्ट समीक्षेसाठी ब्लॉगर्स काम करत आहेत. मीही यासाठी काम केले असून, हे क्षेत्र तरुणांसाठी करिअरचा पर्याय बनले आहे.
                                                                                          – पूजा ढेरिंगे, ब्लॉगर

हेही वाचा

SCROLL FOR NEXT