पुणे: नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएने नीट यूजी 2026 उमेदवारांच्या परीक्षा शुल्क परताव्यासाठी नोंदणी पोर्टलवर विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार बँक खाते तपशील सादर करण्याची ही सुविधा सुरू झाली असून, 27 मे 2026 रोजी रात्री 11:50 वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे.
उमेदवारांनी त्यांच्या लॉगिन आयडी आणि पासवर्डचा वापर करून नोंदणी पोर्टलमध्ये लॉगिन करावे आणि रिफंड लिंकवर क्लिक करून परतावा पोर्टल उघडावे. या पोर्टलवर उमेदवारांना त्यांच्या बँक खात्याचे तपशील भरता येणार आहेत. बँक खात्याची माहिती अचूक राहावी, यासाठी इच्छुक उमेदवारांना रद्द केलेला धनादेश अपलोड करण्याची सुविधाही देण्यात आली आहे.
उमेदवारांनी एकदा बँक तपशील सादर केल्यानंतर ते अंतिम मानले जातील आणि त्यामध्ये पुढील कोणताही बदल करता येणार नाही. उमेदवारांनी परिशिष्ट- ख मध्ये नमूद करण्यात आलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा चार्जबॅक सुरू न करण्याचा सल्ला दिला आहे. शुल्क परताव्याची प्रक्रिया अधिकृत पद्धतीने करण्यात येणार असल्याचेही संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, एनटीएने स्पष्ट केले आहे की, येत्या 21 जूनला होणार्या नीट फेरपरीक्षेसाठी नवीन नोंदणी करण्याची गरज नाही. यापूर्वी रद्द झालेल्या परीक्षेसाठी केलेला अर्ज फेरपरीक्षेसाठी ग््रााह्य धरला जाणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्र देखील तेच राहणार आहेत.
नीट यूजीच्या फेरपरीक्षेसाठी अर्ज तेच राहणार असल्याने प्रवेशपत्राचे काय? असा प्रश्न परीक्षार्थींना पडला आहे. यावरही ’एनटीए’ने उत्तर दिले आहे. ’एनटीए’ने दिलेल्या माहितीनुसार, परीक्षार्थींना नवीन प्रवेशपत्र मिळतील. परीक्षार्थी हे नवीन प्रवेशपत्र एनटीए नीटच्या वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतील.