College Pudhari
पुणे

Maharashtra Integrated Junior College Investigation: नीट प्रकरणानंतर इंटिग्रेटेड कनिष्ठ महाविद्यालयांची चौकशी सुरू

कोचिंग-कोलेज टायअपवर शिक्षण विभागाचे लक्ष; पुणे विभागात विशेष तपासणीसाठी पथके नियुक्त

पुढारी वृत्तसेवा

पुणे: नीट पेपरफुटी प्रकरणानंतर राज्यभर चर्चेत आलेल्या इंटिग्रेटेड कनिष्ठ महाविद्यालये (कोचिंग क्लास-महाविद्यालय टायअप) व्यवस्थेची सखोल चौकशी करण्यासाठी शिक्षण विभागाने आता हालचाली सुरू केल्या आहेत.

पुणे विभागातील पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील कनिष्ठ महाविद्यालयांची विशेष पडताळणी करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथके नियुक्त करून महाविद्यालयांच्या कार्यपद्धतीची तपासणी करण्यात येणार आहे.

युवासेनेचे राज्य सहसचिव कल्पेश यादव यांनी राज्य शासनाकडे निवेदन सादर करून इंटिग्रेटेड महाविद्यालयांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या अनियमिततेकडे लक्ष वेधले होते. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर अशा महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसच्या जाळ्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिक्षण विभागाने तातडीने परिपत्रक जाहीर करत पडताळणी प्रक्रिया सुरू केली आहे.

डॉ. मोरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, कनिष्ठ महाविद्यालयांची मूळ मान्यता, संस्थेची नोंदणी व मान्यतासंबंधी कागदपत्रे, विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक उपस्थिती, नियमित हजेरी नोंदी, जनरल रजिस्टर तसेच उपलब्ध भौतिक सुविधांची तपासणी केली जाणार आहे. याशिवाय कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयांमधील टायअपची कार्यपद्धतीही तपासण्यात येणार असून, विद्यार्थी, पालक किंवा इतरांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधितांविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

विशेष तपासणी मोहीम राज्यभर राबवा

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर इंटिग्रेटेड महाविद्यालयांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्याअनुषंगाने शिक्षण विभागाने पुणे विभागातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या पडताळणीचे आदेश दिले आहेत, ही सकारात्मक बाब आहे. मात्र, ही कारवाई केवळ कागदावर किंवा पुणे विभागापुरती मर्यादित न ठेवता राज्यातील सर्व विभागांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्था आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची प्रमुख मागणी असल्याचे कल्पेश यादव यांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT