Nilam Gorhe on Vaishnavi Hagawane Case
पिंपरी/पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाच्या तपासात कोणतीही त्रुटी राहू नये. संशयितांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मदत करणार्यांवर कारवाई झाली पाहिजे, असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी स्पष्ट केले आहे.
गोर्हे यांनी वैष्णवी हगवणे हिच्या आई-वडिलांची पिंपरी-चिंचवडमध्ये भेट घेतली, त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. या वेळी शिवसेना संपर्कप्रमुख सारिका पवार, कांता पांढरे, सुदर्शन त्रिगुणाईत, जिल्हाप्रमुख मनीषा परांडे, स्त्री आधार केंद्र पुणेच्या अनिता शिंदे आदी उपस्थित होते. (Latest Pune News)
पोलिसांकडून मयूरी जगताप यांच्या प्रकरणात चार्जशीट दाखल झालेली असून, साक्षी-पुराव्यात कोणताही हस्तक्षेप शक्य नसल्याचे सांगण्यात आले आहे. हुंडाबळीच्या शिकार झालेल्या मुलींना न्याय मिळावा, यासाठी पोलिसांनी काही केले नाही, हे म्हणण्यापेक्षा पीडित महिलांची कायदा साक्षरता वाढविणे गरजेचे आहे. समाज म्हणून आपण सर्वजण निष्पक्षपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे, असे डॉ. गोर्हे यांनी नमूद केले.
वैष्णवी हगवणेची जाऊ मयूरी जगताप हिची भेट घेऊन तिला देखील न्याय मिळवून देण्याचे आश्वासन डॉ. गोर्हे यांनी दिले. तसेच, या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतली असून, मयूरी व वैष्णवीला नक्की न्याय मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
उपसभापती गोर्हे यांनी महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, महिला आयोगाने मयूरी जगताप प्रकरणामध्ये पोलिसांना कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायद्यानुसार चालविण्याचा सल्ला दिला असता, तर आत्तापर्यंत तिला प्रॉपर्टीत वाटा मिळाला असता.
मात्र, राज्य महिला आयोगाचे काय चूक आणि बरोबर हे ‘ट्रायल बाय मीडिया’ होऊ नये. मात्र, ते जे काही काम करीत आहेत, त्यात अजून काही तज्ज्ञ व सामाजिक संस्थांना सोबत घेऊन बैठका घ्याव्यात. विजया रहाटकर यांनी ते केले होते. महिला आयोगाच्या सध्याच्या अध्यक्षांना शक्य नसेल, तर दुसर्या कुणीतरी नियमित बैठका घेणे आवश्यक आहे. तसेच, अद्यापही महिला आयोगावरील सदस्यांची पदे रिक्त असल्याचेही त्यांनी लक्षात आणून दिले.