पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून सामाजिक अस्थिरता तयार झाली आहे. मात्र, आरक्षणासाठी शेवटच्या घटकापर्यंत शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करावा लागणार असून, ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे आरक्षण देणे हा तितका सोपा विषय नाही, अशी स्पष्टोक्ती माजी खासदार आणि स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी दिली.
राज्य मागासवर्ग आयोगाची पुण्यात शनिवारी (दि. 18) बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी युवराज छत्रपती यांनी आयोगाच्या सदस्यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाबाबत विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संभाजी राजे म्हणाले, 'मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या आयोगाने शिफारशी केल्या आहेत. परंतु मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा अशा प्रकारे सरसकट सर्वांना आरक्षण देता येते का, याबाबत गायकवाड आयोग, रोहिणी आयोगाने केलेल्या शिफारशी अजूनही समोर आलेल्या नाहीत.
राज्य मागासवर्ग आयोगाकडून मोठ्या प्रमाणात माहिती गोळा करण्यात येत आहे. पुण्यासारख्या ठिकाणी आयोगाला एक हजार चौरस फूट जागेचेदेखील कार्यालय देण्यात आलेले नाही. राज्यातील संपूर्ण मराठा समाजाची माहिती, कागदपत्र गोळा केली जात असून, ही माहिती संगणकीकृत करण्यात येणार आहे. पण आयोगाला स्वतंत्र जागा, निधी आणि यंत्रणा नसल्याची खंत संभाजी राजे यांनी व्यक्त केली. संपूर्ण यंत्रणा दिल्याशिवाय शास्त्रोक्त पद्धतीने कामकाज होऊ शकणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
'ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मी आतापर्यंत फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा वारसदार समजत होतो; परंतु काल त्यांचे अंबड येथील मेळाव्यात केलेले भाषण ऐकल्यानंतर त्यांनी जी पातळी गाठली आहे, त्याचा मनस्ताप होत आहे,' अशी टीका माजी खासदार आणि स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी शनिवारी केली. शनिवारी पुण्यात मागासवर्ग आयोगाची बैठक पार पडली. आयोगाची भेट घेतल्यानंतर छत्रपती संभाजी राजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी ही टीका केली.
हेही वाचा