प्रदूषण रोखण्यासाठी मुंबईत 15 डिसेंबरनंतर कृत्रिम पाऊस | पुढारी

प्रदूषण रोखण्यासाठी मुंबईत 15 डिसेंबरनंतर कृत्रिम पाऊस

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी दिल्लीनंतर मुंबईतही कृत्रिम पाऊस पाडला जाणार आहे. याचा एकावेळेचा खर्च सुमारे 40 ते 50 लाखांच्या घरात आहे. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी वातावरणानेही साथ देणे आवश्यक आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास किमान 15 दिवस तरी मुंबईकरांची प्रदूषणातून सुटका होईल, असा दावा करण्यात येत आहे.

मुंबईतील प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने शहरात सुरू असलेल्या बांधकामांवर अनेक निर्बंध घातले आहेत. एवढेच नाही, तर दररोज पाण्याने रस्तेही धुतले जात आहेत; तरीही प्रदूषणामध्ये फारशी घट झालेली दिसून येत नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिका प्रशासन कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार आहे. कृत्रिम पावसासाठी ज्या भागात पाऊस पडण्यात येणार त्या भागातील आर्द्रता 70 टक्के असणे आवश्यक आहे. दिवाळीनंतर मुंबईतील हवा अजूनच प्रदूषित झाली असल्यामुळे हे प्रदूषण थांबवण्यासाठी कृत्रिम पावसाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी पुढील आठवड्यात विविध प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

असा पाडला जातो कृत्रिम पाऊस

कृत्रिम पावसासाठी योग्य ढगांची निवड करून त्यात विशेष प्रकारच्या कणांचा शिडकावा केला जातो. या कारणामुळे बाष्प एकत्रित होऊन ढगांमध्ये साठलेले पाण्याचे थेंब जमिनीवर पावसाच्या रूपाने कोसळतात. कृत्रिम पाऊस तीन प्रकारे पाडला जातो. विमानाने शिडकावा, ढगात रॉकेटद्वारे रसायने सोडणे आणि जमिनीवर रसायने जाळणे यांचा समावेश आहे.

Back to top button