पुणे

व्यवसायिक अभ्यासक्रमांचे दोन हजार विद्यार्थी अपात्र?

अमृता चौगुले

गणेश खळदकर

पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलद्वारे प्रवेशित व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याचे प्रवेश नियामक प्राधिकरणाने काढलेल्या त्रुटींवरून उघडकीस आले आहे. त्यामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारित असलेल्या 116 आणि उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारित असलेल्या 71 महाविद्यालयांचे धाबे दणाणले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये 2017-18 आणि 2021-22 या वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची पात्रता विद्यापीठाच्या शैक्षणिक पात्रता विभागाकडून तपासण्यात येते. विद्यार्थी ज्यावेळी सीईटीच्या माध्यमातून विविध महाविद्यालयात प्रवेश घेतात. त्यावेळी त्यांची कागदपत्रे तपासूनच त्यांना प्रवेश दिला जात असतो. त्यानंतर विद्यापीठाकडून विविध महाविद्यालये विद्यार्थ्यांची पात्रता तपासून घेतात. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये प्रवेश नियामक प्राधिकरणाने पुणे विद्यापीठात एक कॅम्प आयोजित केला. यामध्ये विद्यापीठाचे काही कर्मचारी, उच्च शिक्षण संचालनालयाचे काही अधिकारी, तंत्रशिक्षण संचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते. यामध्ये तब्बल 2 हजार 64 विद्यार्थ्यांच्या कागदपत्रामध्ये त्रुटी काढण्यात आल्या आहेत.

अधिकार्‍यांनी मात्र झटकले हात

संबंधित विद्यार्थ्यांकडून पुन्हा अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये विद्यार्थ्याचे नाव, महाविद्यालयाचे नाव, विद्यार्थ्याचा संपर्क क्रमांक, तसेच पुन्हा अर्ज करण्याचे प्रक्रिया शुल्क आदी बाबींचा समावेश आहे. त्यामुळे 2 हजार 64 विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करावा लागणार आहे. तर महाविद्यालयांच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, प्रवेश नियामक प्राधिकरणाने काढलेल्या त्रुटींची पूर्तता काही महाविद्यालयांनी केली आहे. तरीदेखील काही महाविद्यालयांना पुन्हा नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या कामावरच शंका उपस्थित करण्यात येत आहे. तर उच्च शिक्षण संचालनालय तसेच तंत्रशिक्षणच्या अधिकार्‍यांनी मात्र हात झटकले आहेत. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात आले असून त्यांना प्रवेश मिळणार की, त्यांचा प्रवेश रद्द केला जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबतीत महाविद्यालयांनीदेखील विद्यार्थ्यांना अंधारात ठेवल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घेतलेल्या प्रवेशासाठी ते पात्र आहेत की नाहीत हे विद्यार्थ्यांनीच तपासणे गरजेचे बनले असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनातील अधिकार्‍यांनी दिली.

अभ्यासक्रमांचे नाव व अपात्र विद्यार्थी

बीई- 101, थेट द्वितीय वर्ष – 67, एम.ई. – 44, बी.फार्मसी – 7, थेट द्वितीय वर्ष फार्मसी -2, फार्म डी-2, एम फार्म – 1, बी.आर्च. – 2, एमबीए – 488, एमसीए – 106, बीएस्सी बीएड – 10, बीए बीएड- 10, बीएड-1154, एमएड-66, विधी तीन वर्षे – 4 एकूण 2064

महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देताना विद्यार्थ्यांची पात्रता पूर्ण आहे का याची तपासणी करण्यासाठी कागदपत्रांची पडताळणी करून आम्हाला रिपोर्ट करण्यास सांगितले आहे. ज्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा निर्णय आहे. त्याची आम्हाला माहिती आवश्यक आहे.

                                                    – जे. पी. डांगे, अध्यक्ष, प्रवेश नियामक प्राधिकरण

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT