NDA Women Cadets Pudhari
पुणे

Pune NDA Women Cadets: एनडीएच्या 150 व्या दीक्षान्त सोहळ्यात महिला कॅडेट्सची तिसरी तुकडी सज्ज

खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीतून महिला अधिकाऱ्यांचा नवा इतिहास; 30 मे रोजी दीक्षान्त समारंभ

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पहाटे साडेतीनची वेळ, खडकवासला येथील एनडीएच्या भव्य परिसरातून काळ्याकुट्ट आंधारात सीनिअर कॅडेट एक हाळी देते... उठो जॅग्वॉर... (उठा चित्त्यांनो) त्याबरोबर सर्व मुली वायुच्या वेगाने भल्या पहाटे तयार होऊन शारीरिक चाचणीसाठी बाहेर पडतात अन्‌‍ मग सुरू होते दिवसभराची परेड...

यंदा एनडीए (राष्ट्रीय सुरक्षा अकादमी)चा ऐतिहासिक असा 150 वा दीक्षान्त समारंभ 30 मे रोजी होणार आहे. या समारंभाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिला अधिकाऱ्यांची तिसरी तुकडी अधिकारी बनून सैन्यदलात जाणार आहेत.

एनडीएची स्थापना 7 डिसेंबर 1954 रोजी झाली. त्यानंतर 16 जानेवारी 1955 रोजी उद्घाटन समारंभ पार पडला. खडकवासला येथे प्रथमच जगातील पहिले त्रि-सेवा (लष्कर, नौदल, वायुदल) लष्करी प्रशिक्षण अकादमी तयार झाली. जिचे नाव आज जगात सन्मानाने घेतले जाते. देशाच्या सैन्य दलात तेव्हापासून चांगले अधिकारी येथून मिळू लागले.

महिलांना न्याय मिळाला तो क्षण

मात्र, येथे 2021 पर्यंत महिलांना प्रवेश नव्हता. सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशाने महिलांना तो प्रवेश सुरू झाला आणि सन 2022 मध्ये मुलींची पहिली बॅच दाखल झाली. त्या ऐतिहासिक बॅचमध्ये 17 मुली होत्या, ज्या देशाच्या कानाकोपऱ्यातून एनडीएची अवघड परीक्षा पास होऊन आल्या होत्या. 30 मे 2025 रोजी 148 व्या दीक्षान्त समारंभात या मुली अधिकारी म्हणून बाहेर पडल्या. तेव्हा त्यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. या सतरा अधिकारी मुलींनी मुलांच्या बरोबरीने कठोर कष्ट करीत सैन्यदलात अधिकारी म्हणून जाण्याचा मान मिळवला.

मुलींनाही मिळते कठोर प्रशिक्षण

  • या ठिकाणी मुलांप्रमाणेच मुलींना कठोर परिश्रम घ्यावे लागतात. यात शारीरिक क्षमता, ड्रील, परेड, युद्धनीती, नकाशा वाचन, युद्ध सराव, अडथळ्याची शर्यत, क्रॉस कंट्री, रनिंग, शस्त्र हाताळणी, घोडेस्वारी, नेतृत्वगुण, पोहण्याचा सराव

  • बीए, बीएस्सी, बी.टेक. या तीन पदवी या ठिकाणी तीन वर्षांत पूर्ण करीत कठोर लष्करी प्रशिक्षण घ्यावे लागते.

  • युद्धभूमीवरचे प्रशिक्षण, लढाई, जलप्रशिक्षण, हवाई प्रशिक्षण यांचा समावेश असतो.

  • संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार येथे सध्या हरियाणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, आसाम, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातील 20 पेक्षा मुली तिसऱ्या बॅचमध्ये प्रशिक्षण घेत आहेत.

  • एनडीएच्या दीक्षान्त सोहळ्यानंतर कॅडेस लष्करात भरती होण्यापूर्वी इंडियन मिलिटरी ॲकॅडमी, नौदलासाठी इंडियन नेव्हल ॲकॅडमी आणि वायुदलात सहभागी होण्याआधी इंडियन एअरफोर्स अकादमी येथे पुन्हा स्वतंत्र प्रशिक्षणासाठी रवाना होतात.

  • महिला प्रवेशामुळे एनडीएच्या इतिहासात मोठा बदल झाला असून, भारतीय संरक्षण दलांत स्त्री, पुरुष समानतेचा नवा अध्याय सुरू झाला.

  • मे 2025 मध्ये 148 व्या दीक्षान्त समारंभात 17 महिला अधिकाऱ्यांची पहिली तुकडी बाहेर पडली.

  • नोव्हेंबर 2025 मध्ये 149 व्या दीक्षान्त समारंभात 16 महिला अधिकाऱ्यांची तुकडी बाहेर पडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT