पुणे : भारतीय सैन्यदलासह राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या इतिहासातील मोठा क्षण शुक्रवारी (दि. 30) अनुभवायला मिळाला. एनडीएतील 148 व्या तुकडीचे दीक्षान्त संचलन 75 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एकत्रित झाले. 17 महिला कॅडेटस्ची पहिली तुकडी एनडीएतून बाहेर पडली. आपल्या कुटुंबीयांसमोर 17 मुलींनी पूशअप्स मारत मुलांच्या तुलनेत ‘हम भी कुछ कम नहीं’चा संदेश दिला.
शुक्रवारी एनडीएमध्ये एकच चर्चा होती, ती म्हणजे पंचाहत्तर वर्षांच्या इतिहासात प्रथमच अधिकारी म्हणून सैन्यदलात दाखल होणार्या पहिल्या बॅचच्या सतरा मुलींची. या दीक्षान्त परेडचे वैशिष्ट्य म्हणजे कॅडेटस्मध्ये मुले आणि मुली असा भेद न मानता, दोन्ही कॅडेटस्नी एकत्रित बहारदार पथसंचलन केले. त्यातून मुले-मुली दूरवरून ओळखणे कठीण होते. खूप जवळ येताच मुलींची ओळख पटली. मिझोरामचे राज्यपाल तथा निवृत्त जनरल डॉ. व्ही. के. (विजयकुमार) सिंग यांची दीक्षान्त संचलनाला प्रमुख उपस्थिती होती. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख ले. जनरल धीरज सेठ, एनडीएचे प्रमुख व्हॉईस अॅडमिरल गुरचरण सिंग, उपप्रमुख एअर मार्शल सरताज बेदी यावेळी उपस्थित होते.