पुणे: आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) जोरदार तयारी सुरू केली आहे. “प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार राहा, सर्वच जागांसाठी तयारी करा आणि आवश्यक असेल तर स्वबळावर निवडणूक लढण्यासही सज्ज राहा,” अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रभागरचनेबाबत चर्चा केली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी स्वतः येथील भाजपच्या पदाधिकार्यांना तशा सूचना केल्या होत्या. मात्र, केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मोहोळ यांनी मात्र मी मुख्यमंत्र्याशी बोलतो, तुम्ही आपल्या पद्धतीनेच रचना करा, अशी भूमिका घेतली. मोहोळ यांना आपण लोकसभा निवडणुकीत मदत केली होती. त्यामुळे त्यांनी अशी भूमिका घ्यायला नको होती, असे सांगत पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
पुणे महानगरपालिकेची प्रारूप रचना प्रसिद्ध झाली असून, ही प्रभागरचना भाजपच्या सोयीने करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांच्या प्रभागांची देखील तोडफोड करण्यात आल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर शनिवारी अजित पवार यांनी पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, माजी आमदार, दोन्ही शहराध्यक्षांसह पदाधिकारी व माजी नगरसेवकांची व्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये बैठक घेतली.
या वेळी आगामी निवडणुकीतील रणनीती, प्रभागरचनेतील बदल, नागरिकांच्या अपेक्षा आणि पक्षाची अंतर्गत ताकद, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत अनेक माजी नगरसेवक व पदाधिकार्यांनी प्रभागरचनेतील मोडतोडीवर अजित पवार यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने आपल्याला सोईस्कर अशी प्रभागरचना केली आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी अजित पवार यांच्यासमोर केला. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, “प्रभागरचनेवर हरकत घ्यावीच; परंतु त्यावर वेळ न दवडता त्याचबरोबर सर्व जागांवर लढण्याची तुम्ही तयारी सुरू करा.
परिस्थिती काहीही असो, आपण लढण्यास मागे हटायचे नाही. 2007 पूर्वी देखील अशाच प्रकारे प्रभागरचना आपल्याला विश्वासात न घेता करण्यात आली होती, तरीही आपण सत्तेवर आलो. त्यामुळे प्रभागरचना कशी आहे, याचा विचार न करता कामाला लागा,’ अशा सूचना पवार यांनी या वेळी दिल्या.
मोहोळ यांच्यावर पवारांची नाराजी
प्रभागरचना करताना भाजपने आपल्याला विश्वासात घेतले नसल्याच्या तक्रारीवर बोलताना पवार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी प्रभागरचनेबाबत चर्चा करून आमच्या पदाधिकार्यांना विश्वासात घ्यावे, असे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः येथील भाजपच्या पदाधिकार्यांना तशा सूचना केल्या होत्या. मात्र, केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मोहोळ यांनी मात्र मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो, तुम्ही आपल्या पद्धतीनेच रचना करा, अशी भूमिका घेतली. मोहोळ यांना आपण लोकसभा निवडणुकीत मदत केली होती.
त्यामुळे त्यांनी अशी भूमिका घ्यायला नको होती, असे सांगत पवार यांनी नाराजी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी आपण सत्तेत एकत्र असताना विश्वासात घेत नव्हते, आपणही त्या वेळेस पुणे महापालिकेत लक्ष घालत नव्हतो. मात्र, मी लक्ष घातल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर केला होता, त्यामुळे कोणी आपल्याला मदत केली नाही आणि प्रभागरचना कशी झाली, याचा विचार न करता तुम्ही कामाला लागा. मतदार हे शेवटी तुमचे काम पाहूनच तुम्हाला मतदान करणार आहेत, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
...हा आमचा अंतर्गत प्रश्न
पुण्यात 32 गावांच्या प्रश्नांबाबत बैठक झाल्यावर अजित पवार यांनी माध्यमांशी चर्चा केली. त्यांना प्रभागरचनेबाबत झालेल्या घोळाबद्दल विचारले असता पवार म्हणाले, हा महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे. यावर आम्ही चर्चा करू. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीतील प्रभागरचना मोठ्या प्रमाणावर तशीच ठेवण्यात आली आहे. तेथे तक्रारी कमी आहे. मात्र, पुण्यात परिस्थिती वेगळी आहे. समाविष्ट 32 गावांमध्ये प्रभागरचनेबाबत मोठ्या प्रमाणावर आक्षेप आले आहेत. आम्ही वरिष्ठपातळीवर बैठक घेऊन तो प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू, असे पवार म्हणाले.