NCP leaders oppose appointments
पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची 51 मुद्द्यांवर लावण्यात आलेल्या चौकशीनंतर समितीचे प्राधिकृत अधिकारी म्हणून प्रकाश जगताप आणि दिगंबर हौसारे यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, हे अधिकारी बाजार समितीच्या संचालक मंडळाशी वेळोवेळी संपर्कात आहेत. त्यामुळे, संबंधित अधिकार्यांकडून पारदर्शक चौकशी होईल, असे वाटत नाही. त्यामुळे त्यांची नियुक्ती रद्द करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी केली आहे.
याबाबतचे पत्र राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांना दिले आहे. याखेरीज, खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे पणन संचालक विकास रसाळ यांना या पत्राची प्रत पाठविण्यात आली आहे. प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे गेल्या वर्षभरात पणन संचालक यांच्याकडून विविध तक्रारींच्या अनुषंगाने वेळोवेळी चौकशी व कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. (Latest Pune News)
मात्र, अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने संचालक मंडळाला अभय मिळत आहे. परिणामी, गैरकारभाराला आळा बसताना दिसत नाही. त्यामुळे, जगताप आणि हौसारे यांचे वेस्टेड इंटरेस्ट असल्याने त्यांची नियुक्ती रद्द करावी आणि अन्य त्रयस्त वरिष्ठ अधिकार्यांची नियुक्ती करावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. याबाबत, जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप आणि दिगंबर हौसारे यांच्याशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही.
निवडणूक प्रक्रिया तत्काळ थांबवावी
बाजार समितीच्या सभापती पदाची निवड ही 18 जुलै रोजी होणार आहे़ ती तत्काळ थांबविण्यात यावी. जोपर्यंत चौकशी समितीकडून अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत निवड प्रक्रिया पुढे ढकलावी; अन्यथा सभापती व संचालक मंडळाचा चौकशी समितीच्या कामकाजात अडथळा व राजकीय दबाव येऊ शकतो. त्यामुळे अपेक्षित सखोल सर्वांगीण चौकशी होणार नाही. त्यामुळे, येत्या शुक्रवारी होऊ घातलेली सभापती निवड थांबवावी, अशी मागणीही पत्राद्वारे करण्यात आली आहे.