

पुणे: रसाळ, आंबट-गोड चवीच्या राज्यातील मोसंबीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून मोसंबीची आवक होऊ लागली आहे. रविवारी बाजारात 15 ते 20 टन मोसंबीची आवक झाली. घाऊक बाजारात त्याच्या तीन डझनास 160 ते 260 रुपये, तर चार डझनास 40 ते 130 रुपये दर मिळाला, तर किरकोळ बाजारात 60 ते 80 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारात हैदराबाद आणि छत्रपती संभाजीनगर येथून मोसंबी दाखल होत आहे. यंदा जास्त पाऊस झाल्याने राज्यातून ऐंशी ते शंभर टक्के मोसंबीचे उत्पादन निघण्याचा अंदाज आहे. सद्य:स्थितीत हंगामाची सुरुवात झाल्याने मोसंबीला अद्याप गोडी कमी आहे. (Latest Pune News)
तर, हैदराबाद येथील मोसंबी जुन्या बहरातील असल्याने तिची गोडी टिकून आहे. येत्या पंधरा दिवसांत राज्यातून मोसंबीची आवक वाढेल. त्यानंतर हैदराबाद येथील मोसंबीचा हंगाम संपेल. सद्य:स्थितीत सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर येथील बाजारात मोसंबी विक्रीस पाठवली जात आहे. गोवा आणि कर्नाटक, बेळगाव भागातून मोसंबीला मागणी असल्याचे मोसंबीचे व्यापारी सोनू ढमढेरे यांनी सांगितले.
नव्या व जुन्या आंबेबहरातील फळे बाजारात
बाजारात आंबेबहरातील मोसंबी दाखल होत आहे. यामध्ये हैदराबाद मोसंबीचा जुना, तर छत्रपती संभाजीनगरमधील नवीन बहरातील मोसंबी बाजारात येत आहे. सद्य:स्थितीत जुन्या बहरातील मोसंबीला गोडी आहे. तर, नव्या बहरातील मोसंबी काहीशी आंबट आहे. ऑगस्ट महिन्यापासून छत्रपती संभाजीनगरमधील मोसंबीला गोडी येईल. त्यानंतर मोसंबीची आवक वाढून दरही खाली येतील, असा अंदाज व्यापारीवर्गाकडून वर्तविण्यात आला.